Tuesday, December 29, 2015

आठवते ना, आठवते ना! - इयत्ता आठवी

आठवीत चारुता ताई आमच्या वर्ग शिक्षिका होत्या. त्यांच्याबरोबर आम्ही वर्षभर एक वेगळा उपक्रम राबवला! महिन्यातले एकाआड एक शनिवार वर्गातल्या चौघी जणी दुपारची शाळा सुटल्यावर ताईंबरोबर त्यांच्या घरी जायचो. तिथे अख्खी दुपार घालवायची आणि मग संध्याकाळी घरी परत जायचं! ह्या दुपारच्या वेळात आम्ही काहीतरी कलाकारी करायचो आणि शिवाय एखादी कमी कटकटीची पाककृती बनवायचो. ह्याशिवाय ताईंशी आणि त्यांच्या घरच्यांशी अखंड गप्पा असायच्याच! अशाप्रकारे आम्ही सगळ्या जणी त्या एका वर्षात ताईंच्या घरी जाऊन आलो. हा खरंच खूप छान उपक्रम होता. आता वाटतं की ताईंनी केवढी मोठी commitment केली होती आमच्यासाठी! त्याशिवाय आम्ही चारुता ताईंबरोबर सहाध्याय दिनाला निवारा वृद्धाश्रमात देखील गेलो होतो.

तसं एकदा कधीतरी आम्ही एका एका ताई आणि सरांना आमच्या बरोबर मधल्या सुट्टीत डबा खायला बोलावलं होतं. मधल्या सुट्टीत आम्ही वरच्या उपासना मंदिरात डबा खायचो. दर आठवड्याला दोन मुली वर्ग रक्षक असायच्या. म्हणजे प्रार्थनेच्या वेळी आणि मधल्या सुट्टीत त्यांनी वर्गातच थांबायचं. तशी रक्षण करण्याची खास गरज नव्हतीच पण ती एक जबाबदारी होती जी आम्ही घ्यायला शिकलो. डबा खाण्यापूर्वी वदनी कवळ घेता (नवीन) म्हणायचो आणि सहना ववतु ह्या श्लोकाने शेवट करून मग खायला सुरुवात करायचो.

आठवीत वर्षा सहलीला यु.वि. तल्या तायांबरोबर तिकोन्याला गेलो होतो. आधी रस्ता चुकलो मग बरोबर रस्त्याने वर गेलो. वर पोहोचताना इतका जोराचा वारा सुटला होता की काही अंतर अक्षरशः रांगून गेलो नाहीतर वाऱ्याने उडून गेलो असतो! पाऊस सुरु झालाच! रेनकोट शोभेलाच उरला होता. पाण्याच्या डबक्याच्या मधोमध उडी मारून इतरांच्या अंगावर चिखल उडवत चाललो होतो. शेवटच्या पायऱ्या खूप निसरड्या झाल्या होत्या. त्या चढून वर पोचलो आणि खाली पवना धरणाचे पसरलेलं पाणी पाहून साऱ्याचे सार्थक झाल्यासारखं वाटलं! गडाच्या माथ्यावर ढग उतरले होते त्यामुळे भारी वाटत होतं. गड उतरलो आणि डोळ्यापुढून एसटी निघून गेली! मग एक टेम्पो केला. त्यात उभ्या राहून सगळ्या दुसऱ्या एसटी स्टँडवर पोचलो आणि मग तिथून बस पकडली. भरपूर भिजलो आणि भरपूर मजा केली. वर्षा सहल म्हणजे दुसरं काय असतं!

आठवीत गणेशोत्सवात पहिल्यांदा बरच्या केल्या! मुख्य मिरवणुकीत नाचलो. मिरवणुकीच्या सुरुवातीचा गजर ते शेवटचं रिंगण आणि ह्या दोन्ही मधला काळ सारं intoxicating! ह्याशिवाय गणपतीच्या काळात वेगवेगळ्या मंडळांसमोर आम्ही पथनाट्य करायचो. गणपतीआधी त्याची तयारी असायची. ही पथनाट्य पथकशः असायची. ह्या निमित्ताने पुण्याच्या अनेक वस्त्यांमध्ये जायचो. शाळेचा गणपती हा घरचाच असायचा. रोज सकाळी आरती, प्रसाद असायचा. शाळेत एकदम मंगलमय वातावरण असायचं!

आठवी आणि नववीत शांतला ताईंच्या मार्गदर्शनाखाली केलेले शास्त्र विषयातले प्रकल्प खूप लक्षात आहेत. चौघी/पाच जणींच्या गटाने मिळून हे प्रकल्प केले होते. Brainstorming करून प्रकल्पाचा विषय ठरवायचा, मग ताईंशी चर्चा करून त्याची उद्दिष्ट आणि साधारण पद्धत ठरवायची आणि मग कामाला लागायचं. अनंत अडचणी येणारच असायच्या पण त्याने उत्साह आजीबात कमी व्हायचा नाही! आम्ही नैसर्गिक वाळवी प्रतिबंधक कोणते ह्यावर प्रकल्प केला होता. त्यासाठी पुणे विद्यापीठात जाऊन एका प्राध्यापकांना भेटलो होतो. वाळवीच्या स्लाईडस सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्या होत्या. त्या सरांनी आम्हाला विद्यापीठाच्या परिसरात फिरवून वाळवीची मोठाली वारुळं दाखवली होती. ह्या वारुळांचा जमिनीच्या वर जेवढा विस्तार असतो त्याच्या दुप्पट तिप्पट जमिनीखाली असतो असे सांगितले होते. दुसरा प्रकल्प गांडूळ खताचा केला होता. ह्या सर्व प्रकल्पाचा report लिहायचो आणि वर्गापुढे त्यावर presentation ही द्यायचो. आमचे प्रकल्प खूप ground breaking नव्हते पण संशोधनाची मुलभूत तत्वे आम्ही त्यातून शिकलो. गटात काम करायला शिकलो. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे खूप मज्जा केली!

आमच्या वर्गाला पुस्तकं वाचायला खूप आवडायची. आठवीत इतिहासाच्या तासाला वॉलाँग (ले.कर्नल श्याम चव्हाण) आणि जंग ए काश्मीर अशी दोन पुस्तकं, आणि मराठीला अरुण खोरे यांचे पोरके दिवस हे आत्मचरित्र वाचले होते. ह्याशिवाय आठवीत टीमवी, गणित प्रज्ञा परीक्षा, MTS अशा परीक्षा देखील दिल्या होत्या. आठवीत इंग्रजी शिकवायला राजगुरू सर होते. ते एकदम आजोबांसारखे होते. एकदम बेस्ट शिकवायचे. शेवटच्या तासाला त्यांनी आमच्यासाठी मोतीचुराच्या लाडूंचा एक अख्खा करंडा आणला होता! CBSE ची इंग्रजीची पुस्तके अत्यंत सुरेख असतात. त्यातील literary reader मी बराच काळ जपून ठेवले होते.

एक प्रयोग म्हणून आठवीत आम्हाला अलगुज नावाची सुरेख दैनंदिनी दिली होती. त्यात बरीच वेगवेगळी पानं होती. मी ती अजूनही जपून ठेवली आहे. डायरी ऑफ अॅन फ्रँक वाचल्यापासून मी अधूनमधून डायरी लिहित असे. पण तरी माझी आणि बाकी अनेकींची अलगुज मात्र बरीचशी रिकामीच राहिली! The idea was great but somehow it did not fly.
आठवीत आम्ही भूगोलाचा प्रकल्प केला होता ज्यात भारताचा भूगोल अभ्यासला होता. वर्गात चार ओळी होत्या एका ओळीतल्या मुलींनी एक दिशा असं ठरवून भारताच्या चार दिशांची राज्यं वाटून घेतली होती. ह्या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यात कोणताही लिहिलेला रिपोर्ट द्यायचा नव्हता. आम्ही जे जे काही करू त्या साऱ्याचं शाळेसमोर प्रदर्शन मांडायचं होतं. आम्हाला कळलेला भारत तिथे न लिहिता दाखवायचा होता. कसा ते आमच्या कल्पकतेवर अवलंबून होतं. मग आम्ही audio clips बनवल्या. तिथल्या लोक कलांचे नमुने जमवले. तिथल्या पाककृती बनवून/आणून ठेवल्या. तिथल्या भाषेची ओळख करून दिली. असं अभिनव प्रदर्शन होतं ते! फार मजा आली हा प्रकल्प करायला! भारताची चार भागांत विभागणी देखील सोपी नव्हती! त्यावरून वल्लभभाई पटेल यांना किती कठीण गेलं असेल ह्याची आपल्याला कल्पना येतेय असं आमचं conclusion निघालं!

ह्या भूगोलाच्या प्रकल्पाच्या प्रदर्शनाच्या शनिवारी मी आणि अजून तिघी जणी नव्हतोच! आम्ही गेलो होतो थेऊरला! साखरशाळेत शिकवायला. त्यावेळी प्रबोधिनीच्या प्रचितीतर्फे उसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी साखर शाळा चालवल्या जायच्या. ह्या साखर शाळेत आम्ही आठवी आणि नववीमध्ये चार चार दिवस शिकवायला गेलो होतो. मला वाटतं मुलांचा वर्ग मांजरीच्या साखरशाळेत तर मुलींचा वर्ग थेऊरला अशी विभागणी होती. हा एक खूप काही शिकवून जाणारा अनुभव होता. बहुतांश उसतोडणी कामगार हे स्थलांतरीत मजूर असतात. उसाच्या सीझनमध्ये ४/६ महिने सहकुटुंब इकडे येतात (साधारण जानेवारी ते एप्रिल). त्यांच्या मुलांची शाळा तेव्हा बुडतेच. आता नेमकी एप्रिल मध्ये वार्षिक परीक्षा असते. अर्थात ती बुडाल्याने मुलं पास होत नाहीत. पुन्हा गावी परत गेल्यावर परत त्याच इयत्तेत बसावं लागतं. हे असं कसं चालणार? मग शाळा सुटतेच. ती सुटू नये म्हणून ही १०० दिवसांची साखर शाळा प्रचितीतर्फे चालवली जायची. गीतांजली ताई त्याचं काम बघत होती. साखर शाळेतली मुलं साधारण पहिली ते चौथी मधली असायची. त्यांना शिकवायला खूप मजा यायची. कारण ती बऱ्यापैकी शार्प असायची! एका मुलीने मला खूप आश्चर्यचकित केलं होतं. आम्ही काही मोठ्या मुलांना इंग्रजी शिकवत होतो. त्यांना मुळाक्षरं येत होती. मग स्पेलिंग्स शिकवत होतो. Cat, dog, man असे सोपे शब्द. मग उच्चारावरून त्या शब्दाचे स्पेलिंग काय असेल असा खेळ सुरु झाला. ती मुलगी म्हणाली, “ताई, मी तुझं नाव लिहिणार!” मी म्हटलं, “माझं नाव अवघड आहे कशाला?” पण ती म्हटली मी प्रयत्न करते. काही वेळाने ती पाटी घेऊन आली. त्यावर लिहिलं होतं Ig…. मी तिला विचारलं की, अगं, माझं नाव G पासून नाही J पासून सुरु होतं पण तू आधी I का लिहिलास? त्यावर तिने जे उत्तर दिलं ते इतकं भारी होतं की I was blown away! ती म्हणाली, “ताई तुझ्या नावाच्या सुरुवातीचा जि ह्रस्व आहे ना म्हणून पहिली वेलांटी काढली म्हणून I आधी लिहिला!” I still remember I was speechless! अतिशय हुशार, अतिशय खोडकर आणि खूप जीव लावणारी मुलं होती ती सगळी! त्यांना शिकवताना आम्हीच बरंच काही शिकलो!

थेऊरला वातावरणात सतत मळीचा एक आंबूसगोड वास भरून राहिलेला असायचा. पहिल्यांदा कसेतरी व्हायचे मग त्या वासाची सवय होऊन जायची. आम्ही चार दिवस कारखान्याच्या कामगारांच्या एका बैठ्या चाळीतल्या दोन खोल्यात राहायचो. साखर शाळेत शिकवणारे शिक्षकही त्याच चाळीत राहायचे. बरेचदा गीतांजली ताई तिथेच असायची. आम्ही मिळून स्वयंपाक पण करायचो. सकाळी आणि संध्याकाळी साखर शाळेतल्या मुलांबरोबर भरपूर खेळायचं. दिवसा शाळा. रस्त्याने जाता येता उसाच्या गाड्या भरून चाललेल्या असत. त्यांना मागितलं की उसाची एकदोन कांडकी मिळायची. मग तो उस खात खात गावात भटकायचं, गणपतीच्या मंदिरात, नदीच्या घाटावर! रात्री शाळेतल्या सरांबरोबर गप्पा चालायच्या. एकदा सिनेमाचा विषय निघाला. ती आमची शेवटची रात्र होती. दुसऱ्या दिवशी आम्ही सरांबरोबरच पुण्याला येणार होतो. तर रात्री आमच्या सिनेमाच्या गाण्यांच्या भेंड्या सुरु झाल्या त्या आम्ही झोपताना लक्षात ठेवून दुसऱ्या दिवशी पुण्याला पोहोचेपर्यंत खेळत होतो! धमाल आली होती!

एके दिवशी ह्या मुलांबरोबर त्यांच्या पालावर गेलो होतो. आमच्यासारख्या मुलांना देखील डोकं वाकून आत जायला लागेल असं बुटकं दार आणि आत बराचसा अंधार! सकाळी सकाळी गेलो होतो तर एक मुलगा सांगत आला की त्यांना पहाटे तीन कोल्ह्याची पिल्लं मिळाली आहेत. मग उसाच्या शेतात ती पिल्लं पहायला गेलो. चॉकलेट ब्राऊन रंगाची ती पिल्लं अगदी कुत्रासारखी फक्त लांबूडकं तोंड असलेली होती. आणि त्यांच्या अंगावर खूप मऊ फर होती. आम्ही मुलांच्या घरी आलो होतो. मग चहा तरी प्या असा आग्रह झाला. तेव्हा खूप गूळ घातलेला कोरा चहा प्यायला होता. पण तो चहा फक्त गुळाने इतका गोड लागत होता असं आता वाटत नाही. त्यात मुलांच्या प्रेमाचा खूप मोठा वाटा होता! पुण्याला घरी आलो आणि आपण किती privileged आहोत ह्याची जाणीव झाली.  अशा अनेक जाणीवा प्रबोधिनीतल्या उपक्रमांनी नकळत रुजवल्या. हे खूप मोठे संस्कार प्रबोधिनीने आमच्यावर केले.

तसा आठवीत डिसेंबरमध्ये आमचा एक मोठा संस्कार सोहळा पार पडला तो म्हणजे विद्याव्रत संस्कार. सोप्या भाषेत सांगायचं तर मुंज! म्हणजे पारंपारिक मुंजीत केल्या जाणाऱ्या विधींना फाटा देऊन, मुंजीच्या मूळ उद्देशाला धरून केला जाणारा हा संस्कार. प्रबोधिनीत होणाऱ्या सर्व समारंभांच्या पुस्तिका छापलेल्या आहेत. मात्र विद्याव्रत संस्कार हा केवळ दोन तास चालणारा विधी नव्हता. त्यापूर्वी आम्ही एक महिनाभर त्याच्यासाठी तयारी करत होतो. दर शनिवारी एक अशी पाच व्याख्यानं आम्ही ऐकली. ती ह्याक्रमाने होती – शारीरिक विकसन, मानसिक विकसन, बौद्धिक विकसन, आत्मिक विकसन आणि शेवटचे राष्ट्र अर्चना. ही व्याख्याने आम्हाला प्रबोधिनीच्याच व्यक्तींनी दिली होती. नावाप्रमाणे प्रत्येक व्याख्यानामध्ये व्यक्तिमत्वाच्या त्या त्या पैलूवर लक्ष केंद्रित केलं होतं. फार सुंदर व्याख्यानं झाली होती. मुख्य विद्याव्रत संस्कार हा देखील फार सुंदर सोहोळा असतो. एक दिवस मुलांचा आणि एक दिवस मुलींचा विद्याव्रत संस्काराचा कार्यक्रम होतो. मुलामुलींचे आई वडील देखील ह्या संस्काराच्या वेळी उपस्थित असतात. विद्याव्रतानंतर शनिवारी करण्याची उपासना थोडीशी वेगळी आहे. ह्याची पूर्वतयारी नववी दहावीची मुलंमुली करतात. उपासना मंदिर छान फुलांनी सजवलेलं असतं. आठवीची मुलंमुली उत्सवमूर्ती असतात! ह्या साऱ्याच्या खूप प्रसन्न आठवणी आहेत.
खरंतर मुंज ही मुलं ८-९ वर्षांची असताना केली जाते. पण प्रबोधिनीत पाचवीतच का करत नाहीत विद्याव्रत संस्कार? आता विचार करताना लक्षात येते की पाचवीत वय असलं तरी हा संस्कार करून घेण्याइतकी मानसिक आणि बौद्धिक तयारी झालेली नसते. आठवीत येईपर्यंत प्रबोधिनीत तोवर घेतलेल्या अनुभवांनी एक पाया रचला जातो. ज्यामुळे ह्या संस्काराचा मूळ उद्देश साध्य व्हायला मदत होते.

ह्या संस्कारानंतर मग आम्ही दर शनिवारी खालच्या उपासना मंदिरात उपासनेसाठी जाऊ लागलो. ह्या उपासनेनंतर बरेचदा प्रबोधिनीचे संचालक मा. गिरीशराव आम्हाला मार्गदर्शन करत असत. गिरीशराव खूप सुंदर बोलतात, ऐकत राहावं असं. गिरीशराव विविध विषयांवर बोलत असत. इतिहास, विज्ञान, भाषा किंवा चालू घडामोडी. मला आठवतंय एकदा त्यांनी पोलिओ लसीच्या शोधाची गोष्ट सांगितली होती. Placebo, double blind trial experiments ह्याविषयी तेव्हा पहिल्यांदा ऐकलं. मला ही शनिवारची वैचारिक मेजवानी फार आवडत असे.

आमच्या नंतरच्या तुकड्यांसाठी सज्जनगडावर एक विद्याव्रत संस्कार शिबीर घेतलं गेलं. जी व्याख्यानं आम्ही दर शनिवारी ऐकली त्यांची शिबिरात सत्र घेतली गेली. जरी आमची वेळची व्याख्यानं खूप छान झाली होती तरी मला अशाप्रकारे विद्याव्रत शिबिराची संकल्पना खूप आवडली. इथे ‘अनेक वर्षांनी मग आम्ही त्या न झालेल्या शिबिराची भरपाई केली’ असं नोंदवून ठेवते J

आमचं त्या वेळी विद्याव्रत संस्कार शिबीर झालं नाही तरी एक अद्भूत शिबीर लगेचच झालं. आठवी आणि नववीच्या मुलींचं तंबूतलं शिबीर. सांगवी गावाजवळ युवती विभागाने ८ दिवसाचं शिबीर घेतलं होतं. आयोजनापासून स्वयंपाकापर्यंत सगळी जबाबदारी ह्या तायांनी पार पाडली होती. अक्षरशः तंबू ठोकून राहिलो होतो. कंदील आणि टॉर्चच्या प्रकाशात. हे शिबीर पथकशः झालं होतं. प्रत्येक पथकाचा वेगळा तंबू. भल्या पहाटे उठायचं, ब्रश केलं की उपासना. अंधारात उपासनेला सुरुवात व्हायची पण शेवटचा ओंकार संपवून डोळे उघडले की सभोवताली उजेड असायचा. अशी दिवसाची प्रसन्न सुरुवात. मग चहा, आन्हिकं झाली की खेळ. सकाळच्या सत्रात आम्ही बेसबॉल खेळायला शिकलो होतो. मग नाश्ता, मग दिवसभराचे जे उपक्रम असतील ते. वेगवेगळी सत्र असायची. संध्याकाळी पुन्हा खेळाचे सत्र. त्यात अत्यंत चुरशीच्या पथकशः स्पर्धा झाल्या होत्या. मग अंधार पडल्यावर एखादे पद्य सत्र, जेवणे आणि शेवटी प्रार्थना. रात्री कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशात बाकी सर्वत्र अंधार भरून राहिलेला असताना “मातृमंदिर में चलो” ही प्रार्थना म्हणताना खूप शांत वाटायचं. तंबूतल्या शिबिरात खूप धमाल केली. अनुभवकथनाच्या सत्रांना एक दिवस सुवर्णा ताईंनी बचत गटाच्या कामाविषयी सांगितलं, एक दिवस बागेश्री ताईंनी त्यांच्या दारूबंदीच्या कामाचे थरारक अनुभव सांगितले. एक सत्र पोंक्षे सरांनी पण घेतलं होतं. पण ते कशावर होतं ते आठवत नाहीये.

उद्योग तर असंख्य केले. तिथल्याच एका झाडावर मचाण बांधलं होतं, एक दिवस प्रत्येक पथकाला चूल बांधून त्यावर दिलेल्या शिध्यातून स्वयंपाक करायचा होता. एक भाजी, खिचडी आणि पापड (त्याचा आम्ही मसाला पापड केला). आणि ही स्पर्धा होती! वेळेचं बंधन असलेली. चुलीसाठी दगड शोधण्यापासून सुरुवात होती. मी माझ्या ड्रेसला निखाऱ्यावर गेल्याने भोक पाडून ठेवले होते. मज्जा आली होती. एक दिवस तायांनी जाहीर केले. आज दुपारचा स्वयंपाक नाही. मग जेवायचे काय? तर आम्ही जवळच्या गावांत जायचे. काम करायचे आणि कामाच्या बदल्यात जेवण करून यायचे! मग काय आम्ही जवळच्या एका छोट्या वाडीवर गेलो. तिथे आमचा हा प्रस्ताव मांडला. एक बाई बाहेर भांडी घासत होती. तिने सांगितले ठीक आहे, भांडी घासा. तासभर त्यांची ती जड पितळी भांडी मन लावून घासली. मग कळले की आज त्यांच्या घरी nonveg चा बेत होता! मी आणि अजून एक दोन जणी पडलो शाकाहारी! आता काय करायचं? मग तिची शेजारीण धावून आली. म्हणाली काळजी नको, आमच्याकडे खा! पण मग काम न करता कसं खायचं? मग आधी जेवलो आणि नंतर तिला शेणाने अंगण सारवायला मदत केली. तिथेच पलीकडे काही छोट्या मुली शाळेच्या गॅदरिंगसाठी नाच बसवत होत्या. मग आमच्यातल्या उत्साही मुलींनी तिथे जाऊन लगेच choreographer ची भूमिका निभावली! तिथल्याच एकीचे निरेचे दुकान होते. मग तिथे जाऊन नीरा प्यायलो. तोवर संध्याकाळ झाली होती. मग तिथल्या सगळ्यांचा निरोप घेऊन, संध्याकाळपर्यंत बाहेर ठेवलेली असल्याने आपण नीरा प्यायलो की ताडी असे गहन डिस्कशन करत शिबिरात परत आलो J खरं सांगायचं तर तेव्हा आम्हाला शिबीरच चढलं होतं!

एके दिवशी जवळच्या एका वीटभट्टीवर गेलो. तिथल्या बायकांकडून वीट कशी पडतात हे शिकलो आणि स्वतः काही विटा पाडून बघितल्या. तो साचा माती भरल्यावर भयंकर जड होतो. तो डोक्यावर घेऊन जाणे आणि ओतणे हे किती कष्टाचे काम आहे ह्याची जाणीव झाली. ह्या श्रमाच्या कामाचे दिवसाचे फक्त २० रुपये मिळतात आणि पुरुषांना बायकांपेक्षा जास्ती पैसे मिळतात (जरी सारख्या विटा पाडल्या तरी) हे ही तिथल्या बायकांकडून ऐकलं. आपल्या समाजात काय प्रश्न आहेत हे आम्हाला प्रत्यक्ष अनुभवांतून असं समजत होतं.

एक दिवस गटचर्चा आणि model making अशी सत्रं होती. गटचर्चेला वेगवेगळे विषय होते. नंतर model making साठी आदर्श गाव असा विषय होता. थोडे फार साहित्य दिले होते. मग आम्ही खपून एक गावाचे मॉडेल तयार केले. मॉडेल खाली जमिनीवरच. त्यातील प्रत्येक जागेवर एक काडी खोचून ही जागा आदर्श कशी अशी एक चिठ्ठी टाकली होती! मला वाटतं सुवर्णा ताई परीक्षक म्हणून होत्या. मग आमच्या त्या अति- आदर्श गावाचे मॉडेल बघताना त्यांनी विचारले, “जर गावातले सगळे लोक इतके चांगले, सज्जन असतील तर मग गावात पोलीस स्टेशन कशासाठी?” आमच्यातल्या एकीचे डोके तेवढ्यात चालले, “ताई, गावातले लोक सज्जन असले तरी बाहेरून चोर येऊ शकतात ना! म्हणून पोलीस स्टेशन!” हे उत्तर ऐकून सुवर्णा ताईंबरोबर आम्ही सगळ्या सुद्धा हसत सुटलो! कल्पक जाहिराती, नाटके रचणे अशी बरीच मजेशीर सत्र आम्ही त्यावेळी केली. एका संध्याकाळी एका क्षितिजावर मावळता सूर्य आणि त्याच्या बरोब्बर उलट दिशेच्या क्षितिजावर उगवता चंद्र असा नजारा पाहिला होता. एका रात्री शिबिराच्या जागी चोर आला! आम्ही रात्रीच्या रक्षणाच्या वेळा वाटून घेतल्या होत्या. रोज एक ताई आणि काही मुली दोन दोन तासांच्या गस्तीवर जाग्या राहायच्या. मध्ये शेकोटी पेटवलेली असायची. तर अशा एका रात्री चोर आला होता. तो माणूस दिसल्याने गस्तीवरच्या मुलींनी आरडाओरडा केला आणि चोर चोरी न करताच पळून गेला! दुसऱ्या दिवशी तो चर्चेचा विषय!

Toilets साठी जरा दूर चर खणले होते आणि आडोसा तयार केला होता. आंघोळीला सुट्टीच होती. फक्त हात पाय तोंड स्वच्छ धुणे ह्यावर काम चालू होतं! पिण्याचं पाणी असंच छोट्याश्या तळ्यातून घेऊन, शुद्ध करून वापरत होतो. कोणत्याही शहरी सुखसोयींशिवाय आणि पूर्णपणे निसर्गाच्या सहवासात ते सात दिवस घालवले होते. शिबिरात एक शब्द एकदम हिट झाला होता – भंजाळणे! कोणत्याही प्रसंगी, सजीव निर्जीव कशालाही फिट बसणारा असा भापो शब्द! थोडक्यात आम्ही सगळ्याच भंजाळलो होतो. एका संध्याकाळी आमचे तंबू गुंडाळून जड मनाने पुणे शहरात परत आलो. संध्याकाळचे सात वाजले असतील. शहरातल्या विजेने झळाळून उठलेल्या लक्ष्मी रस्त्यावरून बस शाळेकडे येत होती आणि अंधाराची सवय झालेले आमचे डोळे तो प्रकाश पाहून भंजाळून गेले! तेव्हा आम्हाला भंजाळणेचा एक नवीन अर्थ कळला!
मला वाटते आठवीत (की नववीत?) पुन्हा एकदा आमची क्रीडा प्रात्याक्षिके झाली होती! त्याच्या तयारीसाठी एक क्रीडा शिबीर झाले होते. म्हणजे सात दिवस फक्त खेळ..शाळा, अभ्यासाचे तास काही नाही. तेव्हा एस पी च्या मैदानावर पडीक असायचो. भरपूर नवीन पद्य शिकलो होतो.

ह्या साऱ्या उपक्रमांबरोबर नेहमीचा अभ्यास, युनिट टेस्टस, अवांतर वाचन ह्या गोष्टी चालू होत्याच! आता विचार करताना वाटतं की केवढ्या गोष्टी करत होतो आपण एका वेळी! त्या मानाने आत्ताचं आयुष्य एकदम एकारलेलं आणि एकसुरी वाटू लागतं! मग आठवीत अनुराधा ताईंनी शिकवलेल्या वि. म. कुलकर्णी यांच्या “आठवते ना” कवितेच्या ओळी आठवतात.

मला तरी नित आठवते गा, आठवते ते फुलते जीवन
आक्रसलेल्या चाळीमध्ये या उबगुनी जाता देह आणि मन!

आठवते ना, आठवते ना!

आठवते ना, आठवते ना! – इयत्ता सातवी

आम्हाला सातवीत विशाखा ताई वर्ग शिक्षिका म्हणून हव्या होत्या पण सातवीत शाळा सुरु झाली तेव्हा समजलं की विशाखा ताई रत्नागिरीला राहायला गेल्यामुळे शाळेत शिकवू शकणार नव्हत्या. विशाखा ताई नाहीत ह्याचं भयंकर वाईट वाटतंच होतं पण त्यांनी आपल्याला ह्याबद्दल सांगितलं नाही याचं पण जाम वाईट वाटत होतं! पण काय करता! सातवीत आम्हाला शिकवायला मुकुलिका ताई आल्या. त्याची आठवण म्हणजे त्यांनी त्यांचा पहिला तास आमच्या वर्गावर घेतला. तो तास म्हणजे मुकुलिका ताईंची मुलाखत होती. त्या तासाला दादा (नवाथे) वर्गात शेवटच्या बाकावर बसले होते परीक्षण करायला आणि ताईंनी आम्हाला Pythagoras theorem  शिकवला होता!

आम्हाला इतिहासासाठी पाचवी ते सातवी प्रबोधिनीने तयार केलेली इतिहासाची पुस्तके होती. सातवीत सुचेता ताई इतिहास शिकवायला होत्या. गाथा इतिहास की, प्रज्ञाभरे साहस की असं त्यांनीच लिहिलेलं पुस्तक होतं. ह्यात आम्ही  विविध भारतीय साम्राज्यांचा इतिहास शिकलो. ज्यात चोल, मौर्य इत्यादी प्राचीन घराणी ते पेशवे, राजपूत, शीख आदींचा समावेश होता. त्याच बरोबर प्राचीन भारतातले विद्वान चरक, सुश्रुत, आर्यभट्ट आदींची देखील ओळख होती.  जेव्हा आम्ही शिखांचा इतिहास शिकत होतो तेव्हा आम्ही गुरुद्वारा बघायला गेलो होतो. तिथे गेल्यावर फार शांत वाटलं होतं. आमच्या आधीच्या एका मुलांच्या तुकडीने जेव्हा गुरुद्वाराला भेट दिली होती तेव्हा त्यांनी गुरु ग्रंथ साहिब सन्मानाने उच्च स्थानी ठेवलेला पाहिला. आमच्या वेळी प्रबोधिनीमध्ये रोज प्रार्थनेनंतर गीता आणि गीताईचे चार श्लोक आम्ही म्हणायचो. अर्थात प्रार्थनेला उभं राहताना गीता गीताई पायांपाशी ठेवावी लागायची. मात्र गुरुद्वारा मध्ये गुरु ग्रंथ साहिब उच्च स्थानी पाहून त्या तुकडीतल्या मुलांना वाटले की आपण प्रार्थनेच्या वेळी गीता गीताई पायाशी ठेवतो ते योग्य नाही. मग त्यांनी विचार केला आणि गीता गीताई ठेवण्यासाठी एक गळ्यात अडकवता येईल अशी छोटीशी पिशवी तयार केली आणि त्यांच्या वर्गाने वापरायला सुरुवात केली. आम्हाला सुचेता ताईंनी ही गोष्ट सांगितल्यावर आम्हाला पण ती पटली. मग वर्गातल्या एकीच्या ओळखीने आम्ही ही वर्गासाठी तश्या पिशव्या शिवल्या आणि वापरायला सुरुवात केली. अर्थात नंतर ही कल्पना शाळेने लगेच उचलून धरली आणि शाळेत सगळ्यांना तशा गीता गीताई ठेवण्याच्या पिशव्या वाटण्यात आल्या! आज मागे वळून बघताना शाळेचं फार कौतुक वाटतं! शाळेची धोरणं आणि नियम शिथिल नव्हते पण लवचिक होते त्यामुळे तुम्ही कोणीही असा तुमच्या उत्तम कल्पना लगेच अंमलात आणल्या जात असत!

मला आठवतंय की पंजाबच्या इतिहासाने आम्ही बऱ्यापैकी भारावून गेलो होतो. त्यातूनच मग स्वामी दयानंद सरस्वती ह्यांच्या जीवनावर आम्ही एक नाटक केलं. म्हणजे लिहिणे, बसवणे आणि अभिनय सबकुछ आम्हीच. त्या नाटकात लागणारी एक शंकराची शाडूची पिंड देखील आम्हीच बनवली होती. वर्गात आम्ही ३६ जणी. नाटक असं लिहिलं होतं की प्रत्येकीच्या वाट्याला काहीतरी वाक्य येईल! ह्या नाटकासाठी स्टेज म्हणून जे वापरणार होतो ते नेहमी खालच्या उपासना मंदिरात असायचं. पण नाटक तर वरच्या उपासना मंदिरात करणार होतो. मग काय सगळ्यांनी मिळून ते जड स्टेज चार मजले चढवून वर नेलं आणि नाटक झाल्यावर पुन्हा खाली जागी आणून ठेवलं.

आम्हाला भूगोल शिकवायला नीलिमा ताई होत्या. सातवीत आम्ही युरोपचा भूगोल शिकत होतो. त्यातला सगळ्यात मजेचा भाग म्हणजे नीलिमा ताई युरोपच्या बऱ्याच देशांत फिरून आल्या होत्या त्यामुळे त्यांच्या तोंडून युरोपचं वर्णन आणि त्यांनी काढलेले फोटो पाहत आम्ही भूगोल शिकलो. मजा आली. ह्याशिवाय युरोप मधला एक एक देश निवडून गटाने मिळून त्यावर प्रकल्प देखील केला. माझ्या ग्रुपने ऑस्ट्रीया देशावर प्रकल्प केला होता. त्याबद्दल encyclopedia मध्ये तिथे Right to Education act आहे आणि तो अजून आपल्याकडे नाही हे वाचल्यावर ह्यावर चर्चा केली होती. अजून एक असं की त्याच वेळी हा right to education act पास व्हावा म्हणून पुण्यातल्या संस्थांनी एक भव्य मोर्चा काढला होता. त्यात आमचा वर्ग सहभागी झाला होता. त्या मोर्च्याची सांगता शनिवार वाड्यावर झाली होती. आता इतक्या वर्षांनी त्याच कायद्याखाली प्रबोधिनीला कोर्टात जावे लागले असं कळल्यावर हे सगळं आठवलं! पण हे सगळं विषयांतर! ह्या आठवणीतला महत्वाचा शब्द आहे प्रकल्प! तुम्ही कोणत्याही प्रबोधिनीच्या विद्यार्थ्याशी १५ मिनिटांच्यावर प्रबोधिनीविषयी बोलत राहिलात तर हा शब्द येणारच याची गॅरंटी! प्रकल्प हा प्रबोधिनीच्या शिक्षणाचा अविभाज्य भाग आहे. कोणत्याही विषयाची मुळातून गोडी लागायची असेल तर त्यात काहीतरी कल्पक करून पाहिले पाहिजे. म्हणून मग आम्ही सगळ्या विषयांत प्रकल्प करायचो!

आमचा सातवीचा सहाध्याय दिन खरोखरीचा सहाध्याय दिन होता! म्हणजे आठवी आणि नववीच्या मुली त्यावेळी वर्गोद्दीष्ट म्हणून शिल्पकलेचा अभ्यास करत होत्या. त्यासाठी त्यांनी field visits म्हणून पुण्यातली बरीचशी देवळं हिंडून पाहीली होती. त्यांच्या बरोबर मार्गदर्शन करायला वर्गातल्याच एका विद्यार्थिनीचे बाबा (जे शिल्पकलेचे अभ्यासक होते) असायचे. त्यांच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून ते दोन्ही वर्ग औरंगाबाद आणि वेरूळला जाणार होते. ह्या सगळ्यात आमच्या वर्गाची वर्णी कशी लागली कोणास ठाऊक! पण तीनही वर्गातल्या मुली मिळून ३/४ दिवस मस्त मज्जा केली. एकतर कुठेही एकत्र प्रवास करायचा म्हणजे आमचे घसे बसलेच पाहिजेत! कारण नुसता प्रवास करायचा नाही तर गाणी म्हणत करायचा असं तत्वच! आम्हाला इतक्या कविता, गाणी आणि अभंग येत होते की फिल्मी गाणी कधी म्हटलीच नाहीत! आणि अशा सहली म्हणजे नवीन गाणी शिकण्याचा चान्स! एकदा एका बस ड्रायव्हरने आम्हाला खाली उतरवण्याची धमकी दिली तेव्हाच आम्ही गप्प बसलो होतो! एकूण वेरूळ ट्रीप मध्ये खूप मजा आली. एका अभ्यासकाच्या नजरेतून कैलास मंदिरातली शिल्पं पाहायला मिळाली. त्यातील काही वर्णनं मनावर कोरली गेली आहेत आणि आजही स्पष्ट आठवतात! मूर्तीचं अनेकवचन मूर्तीच होतं हा शिकलेला पहिला धडा. थंडीच्या दिवसांत गेल्याने बरेच काकडलो होतो हे पण लक्षात आहे!

एक दिवस मुकुलिका ताई वर्गात आल्या आणि म्हणाल्या, “पहा, तुम्हाला भेटायला कोण आलंय!” आणि दारातून विशाखा ताई आत आल्या! मग काय काही वेळ वर्गात नुसता गोंधळ, रडारड, हसू आणि मज्जा! “तुम्ही आमचा निरोप न घेता का गेलात?” असं विचारल्यावर ताई म्हणाल्या की, “मला सांगणं अवघड वाटलं!” आता वाटतं की खरंच अवघड होतं सांगणं. पण ही अचानक, अनपेक्षित भेट त्यामुळेच खूप लक्षात आहे!

सातवीत आम्हाला Media awareness नावाचा एक विषय होता. त्यात आम्ही वेगवेगळ्या माध्यमांविषयी माहिती मिळवायचो. गीतांजली ताई (दाते) शिकवायची. त्यात आम्ही तिच्याबरोबर खूप साऱ्या चांगल्या फिल्म्स पाहिल्या. शनिवारी शेवटचा तास असायचा. आम्ही ह्या फिल्म्स पाहायला दृक्श्राव्य कक्षात जायचो. ही एक छोटीशी खोली होती जिथे पडदे लाऊन पूर्ण अंधार करता यायचा. एक विमानाच्या सुरुवातीच्या दिवसांच्या स्पर्धेची गोष्ट सांगणारा जुना इंग्रजी सिनेमा पाहिला होता. त्यात एक विमानांची स्पर्धा होणार असते आणि जिंकणाऱ्याशी एका राजकन्येचं लग्न होणार असतं. तो बघताना पोट धरून हसलो होतो. जुमान्जी पण पाहिला होता. तो संपायच्या आधी शाळा सुटली. पण आम्ही सिनेमा बघण्यात इतके दंग होतो की आम्ही ठरवलं की सिनेमा संपवूनच घरी जायचं! (एव्हाना पालकांना सवय झाली होती. मुलगी एकदा प्रबोधिनीत गेली की यायची वेळ फिक्स नसते!). पुढचा सगळा सिनेमा पाहिला आणि मग घरी गेलो. ह्या विषयातही प्रकल्प होताच! मी वृत्तपत्रातून प्रसिद्ध होणाऱ्या पुरस्काराच्या बातम्या असा विषय घेतला होता. दोन पेपर निवडून एका महिन्यात कोणत्या पुरस्काराच्या, किती आणि कुठल्या पानावर बातम्या छापल्या जातात ह्याचं सर्वेक्षण करायचं होतं. माझ्या आसपास सगळ्यांकडे सकाळच येत होता. मग मी केसरी वाड्यात केसरीच्या कार्यालयात गेले आणि त्यांची परवानगी मागून केसरीचे एका महिन्याचे अंक तिथे बसून चाळले. (आता वाटतं किती दूरदृष्टीने निवडला होता मी माझा विषय!)

नवनवीन गोष्टींची ओळख करून घेणे हे चालूच असायचं. तेव्हा पेजर हा प्रकार नुकताच लोकप्रिय होऊ लागला होता. मग आमच्या वर्गातल्या एकीच्या वडिलांनी येऊन आम्हाला पेजर कसा वापरायचा, त्याचे काम कसे चालते अशी सगळी माहिती दिली होती. त्याच वेळी मग इंटरनेट, इमेल, मोबाईल हे सगळे शब्द ओळखीचे झाले.

सातवीत आम्ही पहिल्यांदा शाळेच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत खऱ्या अर्थाने सहभागी झालो! आमचा बोथाटीचा गट होता. बोथाटी म्हणजे दोन्हीकडे टोकदार सळ्या असलेली बारीक लाकडी काठी. हे एका प्रकारचं शस्त्र आहे. अर्थात आमच्या बोथाटीच्या दोन्ही टोकांना झिरमिळ्या होत्या! पण ढोलाच्या तालावर बोथाटी फिरवणे आणि शिस्तबद्ध हालचाली करणे ह्याची मजा कळली! शाळेचा गणेशोत्सव म्हणजे काय धमाल असते हे कळायला लागलं होतं! केवळ गणपतीतल्या अनुभवांवर पानंच्या पानं लिहिता येतील! ह्याशिवाय सातवीत आम्ही एका वेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसलो होतो. त्यात एक परीक्षा अशी नव्हती पण विविध नवीन कौशल्यं शिकायची होती – पुस्तक परीक्षण ते सायकलचे पंक्चर काढणे अशी वेगवेगळी कौशल्यं. पण खरं सांगायचं तर मला ह्याबद्दल फारश्या आठवणी लक्षात नाहीत! It did not stick very well.  सातवीत अजून एक गोष्ट झाली की आमचे आणि इंग्रजीच्या ताईंचे काही फारसे पटले नाही. सहामाही नंतर स्मिता ताई त्यांच्या बाळंतपणाच्या रजेवर गेल्या आणि नंतर ज्या ताई आल्या त्यांचे शिकवणे आम्हाला मुळीच आवडले नाही. मग एक दुसऱ्या ताई आल्या पण तेही जमेना. मग काय शेवटी पोंक्षे सर आले आणि म्हणाले काय करायचं? आम्ही नक्की काय केलं ते आठवत नाही पण आता विचार करताना वाटतं की किती लाडावलेली मुलं होतो आम्ही! असो. पण त्यानंतर आठवी ते दहावी आमचे इंग्रजीचे ग्रह अत्यंत उच्चीचे राहिले! We had the best possible English teachers in the world!

आम्ही एकीकडे संस्कृत आणि हिंदीच्या टीमविच्या परीक्षा देत होतो. शिवाय आद्य शंकराचार्य प्रतिष्ठानतर्फे एक पाठांतर स्पर्धा होत असे. त्यात शंकराचार्यांची तीन स्त्रोत्रे दिली जात आणि मग स्पर्धेच्या वेळी चिठ्ठी उचलून त्यातलं येईल ते स्तोत्र म्हणायचं. आमच्या वर्गाने बरीच वर्षं त्यात भाग घेतला होता. ज्या शाळेतली सगळ्यात जास्ती मुलं जिंकायची त्या शाळेला करंडक होता. तो आम्ही एकाहून अधिक वेळा पटकावला होता. ह्या स्पर्धा सारसबागेसमोरच्या शंकराचार्य मठात होत असत. ह्या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला खूप छान स्तोत्र शिकायला मिळाली. त्यातली काही लक्षात राहिली आहेत थोडीफार. माझं आत्मषटकम् आवडतं स्तोत्र आहे. त्याशिवाय एकदा आम्ही शाळेच्या वेळात भरत नाट्य मंदिरात एक विनोदी संस्कृत नाटक देखील पाहायला गेलो होतो. सातवीत आमची वर्गखोली दोनदा बदलली होती. मला प्रबोधिनीतले मुलींचे वर्ग फार आवडतात. मोठ्या मोठ्या भिंतभर खिडक्या, भरपूर प्रकाश आणि एकदम हवेशीर! तर त्या भिंतभर खिडक्यांना ऊन येऊ नये म्हणून पडदे लावायची सोय होती. आम्ही वर्ग बदलून ज्या दुसऱ्या वर्गात गेलो त्या पडद्यांचा दांडा जरा नाजूक झाला होता. जरा जोर लावून ओढलं की सगळे पडदे खाली पडत! एकदा आमच्या हे लक्षात आल्यापासून आम्ही हे अस्त्र वापरायला सुरुवात केली! कोणत्याही तासाला जरा बोअर व्हायला लागलं की खिडकी शेजारी बसणाऱ्या मुली पडदा ओढायच्या की धडाम! मग वर चढून तो दांडा बसवा वगैरे मध्ये १० मिनिटं जायची! अर्थात ही ट्रिक आम्ही सर्वात जास्ती इंग्रजीच्या तासांना वापरली!

सर्कसला दिलेली भेट – पुण्यात तेव्हा सर्कस आली होती आणि आम्ही काही जणींनी जाऊन तिथल्या कलाकारांच्या भेटी घेतल्या होत्या. असे सकाळी साडे आठ नऊ वाजता गेलो होतो. काहीही दिवे झगमगाट नसताना सर्कशीचा तंबू आणि तिथल्या बाकी तंबूत जाऊन गप्पा मारताना एका वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटले होते. मग त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही त्या सर्कसचा शो पहायला गेलो. मजा आली पण सकाळची चित्र पण मनात राहिली होती. आम्ही ही सर्कस भेट/मुलाखत छात्र प्रबोधनच्या अंकासाठी घेतली होती. ती छापून आली की नाही ते आठवत नाही. पण सातवीत मी अनुराधा ताईंनी सुचवलं म्हणून राज्य स्तरीय बालकुमार साहित्य स्पर्धेत एक कथा लिहून पाठवली होती जिला दुसरा क्रमांक मिळाला होता. पहिला क्रमांक देखील प्रबोधिनीच्याच सहावीतल्या एकीला मिळाला होता. ह्या दोन्ही कथा छात्र प्रबोधन मध्ये छापून आल्या होत्या. त्याचा बक्षीस समारंभ शाळेतच झाला होता. त्याची इतकी आठवण राहण्याचे कारण म्हणजे त्या समारंभासाठी भा.रा. भागवत आणि त्यांच्या पत्नी लीलावती भागवत प्रमुख पाहुणे होते आणि त्यांच्याच हातून आम्हाला बक्षीस मिळाले होते. भा.रां.ची पुस्तके अत्यंत आवडत्या कॅटेगरीत असल्याने त्यांच्या हस्ते बक्षीस मिळणार ह्याचा भयंकर आनंद झाला होता!

छाप्रची अजून एक आठवण म्हणजे छाप्रची एक स्वतःची अत्यंत सुरेख लायब्ररी होती. त्यात मराठी साहित्यातली उत्तमोत्तम सर्व पुस्तके होती. आमच्या वर्गातल्या काही वाचनवेड्या मुलींनी तीही लायब्ररी लावली होती. मी जवळपास रोज नवीन पुस्तक घेऊन यायचे. रोज शाळेत आल्यावर पहिल्यांदा दुसऱ्या मजल्यावरच्या छाप्रच्या कार्यालयात जायचं, तिथे पुस्तक बदलायचं, सायकलची किल्ली तिथेच विसरायची आणि मग तंद्रीत वर चौथ्या मजल्यावर आपल्या वर्गात यायचं. मग शाळा सुटल्यावर किंवा आता आपल्याला घरी गेलं पाहिजे अशी जाणीव झाल्यावर किल्ली शोधायची आणि मग पुन्हा छाप्रच्या कार्यालयात जाऊन सायकलची किल्ली घ्यायची हा माझा ठरलेला दिनक्रम होता. अधाश्यासारखी पुस्तकं वाचायचो आम्ही!

सातवी ते दहावी आम्हाला आठवड्यातून दोन तास अभिव्यक्तीचे तास असायचे. अभिव्यक्तीचे विविध विषय होते – बांधणी, रांगोळी, चित्रकला, भौमितिक प्रतिकृती, नाट्य, शिल्पकला आणि प्रतिभाशाली लेखन. हे विषय बदलत राहायचे. आधी ह्यात स्वयंपाककला, शिवण असेही विषय होते. मी दोन वर्ष प्र.ले., एक वर्ष बांधणी आणि एक वर्ष भौमितीक प्रतिकृती अशा अभिव्यक्तीत होते. ह्या अभिव्यक्तीच्या तासाला सातवी ते दहावीच्या सगळ्या मुली एकत्र असायचो. मजा यायची! प्र.ले. च्या तासांना पहिल्यांदा जी.ए. कुलकर्णी यांची एक कथा वाचली होती आणि भारावून गेलो होतो. इतके की काही काळ कोणीच बोललो नाही!


अशा किती छोट्या छोट्या आठवणी आहेत! शाळेत रोजचा दिवस मज्जा असायची आणि आज हा काल आणि उद्यापेक्षा वेगळा असायचा. त्यामुळे शाळा बुडवणे वगैरे तर शक्यच नव्हते पण रविवारसुद्धा कसाबसा संपवून कधी शाळेत जातोय असं पण व्हायचं कधीकधी! किंवा रविवारी प्रकल्पाच्या कामासाठी शाळेत किंवा कोणाच्या तरी घरी जमायचं आणि मजा करायची! We were very busy and very constructively busy! प्रबोधिनीपण अंगी मुरत जात होतं. मला वाटतं प्रबोधिनीतल्या सहा वर्षांचे दोन भाग करता येतील. पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी. आम्ही पाचवी ते सातवी जे जे काही केलं त्याच्या दसपट गोष्टी पुढच्या तीन वर्षांत केल्या, नवीन अनुभव घेतले, त्यातून मोठे झालो, शहाणे झालो. 

आठवते ना, आठवते ना! – इयत्ता सहावी

पाचवीत असताना इंग्रजी माध्यमाच्या मुलामुलींचे इंग्रजीचे आणि मराठीचे तास वेगवेगळे व्हायचे. पण सहावीपासून आम्ही सगळ्या सगळे विषय एका वर्गात शिकू लागलो. सहावीत आम्हाला विशाखा ताई वर्गशिक्षिका म्हणून लाभल्या होत्या. त्या गणित शिकवायच्या. अतिशय शांत, मृदू स्वभाव! आमची आणि त्यांची जाम म्हणजे जाम गट्टी जुळली! सहावीमधली सगळ्यात ठळक आठवण म्हणजे गणिताचा महायज्ञ! त्या दिवशी काय झालं होतं कोण जाणे आमचे बरेचसे तास होऊ शकणार नव्हते. विशाखा ताई वर्गात आल्या आणि त्यांनी ही बातमी दिली! काही काळ आनंद प्रदर्शनासाठी जोरदार गोंधळ घालू दिल्यानंतर त्यांनी विचारलं मग काय करणार दिवसभर? बरेच पर्याय पुढे आले पण शेवटी गणिताचा महायज्ञ करण्याची कल्पना मान्य झाली. मग ग्रंथालयात जाऊन जितकी मिळतील तितकी सहावीच्या गणिताची पुस्तकं आणण्यात आली. CBSE board ह्या बाबतीत खूप छान आहे. अनेक प्रकाशन संस्था अभ्यासक्रमानुसार पुस्तके बाजारात आणत असतात. विशाखा ताई काही पूर्ण वेळ थांबू शकणार नव्हत्या. त्यांनी साधारण एक शिस्त लावून दिली आणि मग आमचा वर्ग पुढचे ४-५ तास गणिते सोडवीत होता. मज्जा आली! सहा हजाराच्या वर गणिते सोडवली आम्ही त्या दिवशी! मग दुसऱ्या दिवशी प्रार्थनेच्या वेळी सगळ्या शाळेला आमच्या वर्गाचा पराक्रम सांगण्यात आला! आमची कॉलर ताठ! सहावीचा आमचा सहाध्याय दिन थेऊरला झाला. नुकतीच स्वामी कादंबरी वाचल्याने माधवरावांची समाधी, गणपतीचे देऊळ ह्या साऱ्या गोष्टी अत्यंत भारावलेल्या मनाने पाहिल्या! बस स्टँडवर उभं असताना पेरू घेऊन खाल्ले होते हे लक्षात आहे. नंतर पुढे आम्ही सगळ्याजणी पुन्हा थेऊरला एका वेगळ्याच कारणासाठी राहायला आलो. पण त्या आठवणी आठवीत J

सहावीसाठी आमचं वर्गोदिष्ट होतं पाठांतर! आमच्या वर्गाची गाणी आणि कवितांची आवड लक्षात घेऊन हे मिळालं असावं! कविता ताईने आम्हाला भरपूर गाणी आणि कविता शिकवल्या! आम्ही वेगवेगळ्या भारतीय भाषांमधली गाणी सुद्धा शिकलो होतो. आम्हाला physics शिकवायला मंजुषा ताई मुंगी होत्या. त्यांच्या तासाला शेवटची १५ मिनिटं त्या त्यांचे अनुभव सांगायच्या. त्यांनी पूर्वी युवती विभागात काम केलं होतं. त्यांच्या तोंडून आम्ही गाजलेले रूपकंवर सती प्रकरण ऐकले. त्यावेळी प्रबोधिनीतर्फे काही युवती प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राजस्थान दौऱ्यावर गेल्या होत्या त्यात मंजुषा ताई पण होत्या! त्यामुळे त्यांचे प्रत्यक्षदर्शी अनुभव ऐकणे हा देखील एक थ्रिलिंग अनुभव होता. ‘स्वतः पाण्यात उतरा, अनुभव घ्या. काठावर राहून परिस्थिती कशी समजणार?’ अशी प्रबोधिनीची धारणा ह्या अनुभव कथनातून आमच्यापर्यंत पोहोचत होती.

आम्हाला पाचवी आणि सहावीमध्ये चित्रकला आणि सातवीपर्यंत संगीत असे विषय म्हणून होते. अर्थात सातवीनंतर ज्यांना आवड असेल त्यांच्यासाठी ह्या विषयांची सोय होतीच. हिंदी शिकवणाऱ्या चारुता ताई आम्हाला चित्रकला शिकवायच्या. चारुता ताई हिंदी शिकवताना खूप कडक असायच्या पण त्यादेखील तासातला काही वेळ गप्पांना द्यायच्या. चारुता ताईंशी गप्पा म्हणजे हास्याचा पूर! एखादी गंमत/प्रसंग रंगवून सांगण्यात त्यांचा हातखंडा! त्यामुळे माझी चित्रकला म्हणजे एक मोठे अंडाकृती वर्तुळ असले तरी चारुता ताईंच्या तासाला मज्जाच यायची! नंतर आठवीत त्या आमच्या वर्ग शिक्षिका असताना आम्ही त्यांच्याबरोबर खूप धमाल केली.

मंजुषा ताई (ही वेगळी) संगीत शिकवायला होती. आमच्यापैकी बहुतेक सगळ्या जणींनी गांधर्व महाविद्यालयाच्या ३/४ गाण्यांच्या परीक्षा दिल्या आहेत ह्याचं श्रेय मंजुषा ताईचं. आम्ही शाळेत असताना आणि त्यानंतर शाळेचा संगीत कक्ष अद्ययावत आणि विविध वाद्यांनी सुसज्ज करण्याचं मोठं काम मंजुषा ताईने केलं. ह्या प्रकारात गाण्याच्या मुली असा एक गट वर्गात तयार झाला होता. विविध आंतरशालेय गाण्याच्या स्पर्धांमध्ये सहभागी होणे वगैरे गोष्टीत ह्या गटाचा सहभाग असायचा. मंजुषा ताईने गाण्याच्या मुलींना बोलावलं आहे असा निरोप आला की ह्या सगळ्या सटकायच्या!

पाचवीत की सहावीत आमची न्यू इंग्लिश स्कूल च्या मैदानावर क्रीडा प्रात्याक्षिके झाली होती. त्यासाठी जोरदार सराव केल्याचं आठवतंय! रोप मल्लखांब, सायकल कसरती, जिम्नॅस्टिक्स, आगीतून उड्या वगैरे साहसी प्रकार त्यात आम्ही केले होते. एरवी शाळा सुटल्यावर एक दिवसाआड दल असायचं. त्यात वेगवेगळे खेळ, व्यायाम, गणपतीच्या दिवसांत बरच्यांची practice असा कार्यक्रम असायचा. हे दल युवती विभागातल्या ताया घ्यायच्या (मुलांचे युवक विभागातले दादा). मजा असायची. ह्यातल्या बऱ्याच जणी प्रबोधिनीच्याच माजी विद्यार्थिनी. त्या त्यांचं कॉलेज सांभाळून आमचं दल घ्यायला यायच्या. एकूण मजा असायची. ह्याच तायांबरोबर मग आम्ही पावसाळी सहलीला किल्ले सर करायला जायचो, तंबूतलं शिबीर नावाचा एक अद्भूत प्रकार होता. त्याच्या आठवणी नंतर सविस्तर लिहीनच! ह्या ताया फार लाडक्या! आमच्या friend, philosopher and guide. त्यांच्याबरोबर शाळेतल्या ताईंच्या तक्रारी, चेष्टा, वाद, अभ्यास ते आयुष्य सगळ्यावर गहन चर्चा असं सगळं चालायचं! मग दल ६:३० ला सुटलं तरी टीपी करत ७:३० वाजायचे. मग अत्यंत नाईलाजाने गप्पा आवरून घराच्या दिशेने कूच करायची. सहावीपासून माझ्यासाठी घडलेला मोठा बदल म्हणजे मी शाळेत रिक्षाऐवजी सायकलने जाऊ लागले होते. त्यामुळे अचानक वेळेचं खूप स्वातंत्र्य मिळालं! माझ्या आत्याची दोन्ही मुलं प्रबोधिनीची असल्याने तिला आमच्या ह्या बेभरवशी कारभाराची कल्पना होती म्हणून बरं! नाहीतर प्रबोधिनीतल्या मुलांचे पालक होणे सोपे काम नव्हे!

क्रीडा प्रकाराविषयी लिहिताना एक खंत व्यक्त केल्यावाचून राहवत नाही. गावाच्या अगदी मध्यवर्ती भागात असल्याने शाळेला स्वतःचे मैदान नाही. ही एक उणीव तेव्हाही त्रास देत असे. पण मग त्या निमित्ताने आजूबाजूच्या सर्व मैदानांची ओळख झाली. तिथल्या व्यवस्थापकांशी बोलून आवश्यक त्या परवानग्या मिळवणे, मैदानाची आपल्यापुरती निगा राखणे, तिथल्या वेळा पाळणे अशा असंख्य अडचणींना तोंड देत आमचे ताई, दादा (आणि अर्थात त्यांच्यापाठी शाळा) आमच्यासाठी दल घेत असत. महाराष्ट्र मंडळचे मैदान, न्यू इंग्लिश स्कूल, भावे स्कूल, १७ नंबरचे मैदान, नवी पेठ, सुभाषनगर अशा अनेक ठिकाणी असलेल्या मैदानावर आमचे दल भरत असे. तुळशीबागेच्या समोरच्या भाऊ महाराज बोळात पण एक मैदान होते. तिथले दल अगदी वेळेत संपवावे लागे कारण तिथे नंतर संघाची शाखा भरत असे. हे सोडून उपासना मंदिर आणि शाळेची गच्ची ह्या नेहमीच्या यशस्वी जागा होत्याच! इतक्या अडचणी असल्या तरी उत्साह भरपूर! पण तरीही शाळेतली एखादी गोष्ट बदलायची असेल तर मी ही गोष्ट बदलेन! शाळेला एक मोठं, विस्तीर्ण मैदान मिळवून देईन.

सहावीत केलेल्या इतर उद्योगांमध्ये विविध देशांच्या दुतावासांना पत्र लिहून त्या देशांबद्दल माहिती मिळवणे असा एक प्रकल्प केला होता, ह्या शिवाय पुर्वांचलामधल्या काही विद्यार्थ्यांशी पत्रमैत्री देखील केली होती. एकुणात नवनवीन कल्पनांचा विचार करणे आणि त्याची भान विसरून अंमलबजावणी करणे हा गुण अंगी लागायला सुरुवात झाली होती. काहीतरी कामासाठी रविवारी शाळेत चक्कर मारणे देखील सुरु झाले होते. कोणत्याशा बाल चित्रपट चळवळीमार्फत विजय टॉकीजला काही रविवार चार्ली चॅप्लिनचे सिनेमे बघितल्याचं पण आठवतंय.

सध्या शाळेच्या दोन इमारती आहेत एक नवीन आणि एक जुनी. पण मी शाळेत असताना नवीन इमारतीच्या जागी एक बैठी, दुमजली दगडी वास्तू होती ज्यात युवती विभाग आणि सहनिवास (मुलांचं हॉस्टेल) होतं. यु.वि. ही टीपी करण्याची नेहमीची जागा. त्या दोन खोल्यात आम्ही प्रचंड दंगा घालायचो. जसजशी वर्ष गेली तशा आमच्या खास जागा शोधून काढल्या होत्या. डोक्यात सतत चक्र फिरत असायची. त्या गोष्टी discuss करायला ह्या जागा होत्या किंवा मग एकटीने जाऊन निवांत पुस्तक वाचणे/अभ्यास करणे ह्यासाठी. कोणत्याही जागेची एक short forms ची संकेतभाषा असते. तशी प्रबोधिनीची पण आहेच. प्र.मा.सं, संत्रिका, छाप्र, यु.वि. असे जागांचे short forms तोंडी बसले. शाळा ही हळूहळू दुसरं घर होत गेली.

मला वाटतं सहावीतच आम्ही नागपंचमीला रात्री शाळेत राहायला आलो होतो. हे पहिल्यांदा, नंतर मग अनेकदा शाळेत राहायला गेलो. घरून जेवून आलो आणि मग रात्री उपासना मंदिरात बसून मेंदी काढली. गच्चीवर जाऊन तारे मोजले आणि मग बाराच्या पुढे तायांचा ओरडा ऐकून झोपलो. त्याचवेळी नुकत्याच वाचलेल्या तोत्तोचानच्या शाळेसारखी आपली शाळा आहे असा विचार करून मज्जा वाटली होती. रच्च्याकाने तोत्तोचानचा मराठी अनुवाद एका माजी प्रबोधिकेने (चेतना सरदेशमुख गोसावी) केला आहे J

मला आठवतंय त्याप्रमाणे आम्ही सहावीत एकदा पोंक्षे सरांशी कशावरून तरी तासभर वाद घातला होता. आमची काहीतरी तक्रार होती आणि सर आमचं म्हणणं ऐकून त्यावर त्यांची बाजू मांडत होते. एका वर्षात आपण आपल्या शाळेच्या प्राचार्यांना “मला/आम्हाला हे पटत नाही/मान्य नाही” असं सांगू शकतो आणि आपलं म्हणणं ऐकून घेतलं जाईल एवढा आत्मविश्वास आणि (शाळेविषयी) विश्वास सहावीत निर्माण झाला होता एवढं मात्र नक्की!


सहावी संपताना विशाखा ताईंचं आणि आमचं इतकं गुळपीठ जमलं होतं की आम्ही सगळ्यांनी ठरवून आपल्या मनोगतामध्ये आम्हाला सातवीत विशाखा ताईच वर्ग शिक्षिका म्हणून हव्या अशी मागणी नोंदवली होती! पण त्याचं पुढे काय झालं ते सातवीच्या पोस्टमध्ये!

आठवते ना, आठवते ना! – इयत्ता पाचवी

पुण्यातल्या आणि काही वेळा पुण्याबाहेरच्या शाळांमधून चौथीपर्यंत शिकलेली मुलामुली जेव्हा प्रबोधिनीत येतात तेव्हा काहीही कळत नसतं! निदान मला तरी कळत नव्हतं! त्यातून मी खोपोलीसारख्या छोट्या गावातल्या शाळेतून आल्याने माझ्या कोणीच मैत्रिणी नव्हत्या. माझ्या वर्गात पुण्यातल्या एकाच शाळेतून आल्यामुळे एकमेकींना ओळखणाऱ्या मुली होत्या. पण काहीच दिवसांत आम्ही सगळ्याच इतक्या घट्ट मैत्रिणी झालो की आम्ही काही महिन्यांपूर्वी एकमेकींना ओळखत देखील नव्हतो हे कोणाला खरं वाटणार नाही! शाळा एकदम आपली वाटायला लागली. इतकी की तुझ्या आधीच्या शाळेचं नाव काय असं विचारल्यावर एकदा मी चुकून प्रबोधिनी असं उत्तर दिलं होतं!

शाळेच्या पहिल्याच दिवशी आम्हाला पद्य शिकवायला नववी दहावीच्या ताया आल्या होत्या. त्यांनी “प्रबोधिनीत यायचे समर्थ व्हायला समर्थ मायभूमीला जगी करायला!” हे पद्य शिकवलं आणि आपण प्रबोधिनीत का आलो ह्याचं उत्तर मिळालं! शिकता शिकता पद्य पाठ होतात असंही आम्हाला लगेच लक्षात आलं (किंबहुना ती तशीच पाठ करायची असतात. एक कडवं शिकायचं, म्हणायचं आणि मग दुसरं कडवं शिकायचं, मग पहिलं आणि दुसरं एकदम म्हणायचं! असं करत करत पद्य पाठ होतं!) ही खास प्रबोधिनीची गाणी! शाळेतल्याच आजी माजी लोकांनी रचलेली, (मात्र कोणत्याच पद्याखाली कवी/कवयित्री चे नाव नसलेली), देशभक्तीची स्फूर्तीदायी पद्य! ह्या ना त्या निमित्ताने ही पद्य शिकवली, म्हटली जातात आणि फार प्रेमाने म्हटली जातात. गंमत अशी की ह्यातल्या एक दोन पद्यांच्या चाली ह्या जुन्या हिंदी गाण्यावरून घेतल्या आहेत. पण जर त्यावेळी मला हे कोणी सांगितलं असतं तर ह्या चाली मूळ प्रबोधिनीच्या होत्या आणि मग त्या सिनेमावाल्यांनी चोरल्या असं मला वाटलं असतं! इतकी त्या गाण्यांची क्रेझ होती!

ह्या पाठांतरावरून आठवलं की आमचा पाचवीचा पहिला तास शिकवायला दादा नवाथे आले होते. ऋषितुल्य व्यक्तिमत्व! आप्पांची शाळेची संकल्पना ऐकून त्यासाठी शाळेच्या उभारणीमध्ये योगदान द्यायला स्वतःहून सहभागी झालेले हाडाचे शिक्षक. ते वर्गावर आले आणि आल्याआल्या फळ्यावर हा श्लोक लिहिला.

पुस्तकस्था तु या विद्या, परहस्तगतं धनम्|
कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तद धनम्||

आम्हाला ह्या श्लोकाचा अर्थ समजावला. श्लोक पाठ करून घेतला आणि फळा पुसून टाकला! म्हणाले असंच शिकायचं! त्यावेळी आम्हाला का ही ही कळलं नाही. श्लोक मात्र आजही पाठ आहे आणि आता त्याचा अर्थ नीटच कळतोय!

शाळा सुरु झाली आणि रोजच काही ना काही नवीन घडायला लागलं! एकतर शाळेचा गणवेश रोज नाही! फक्त शनिवारी जेव्हा अर्ध्या दिवसाची आणि सकाळची शाळा असते तेव्हा. शनिवार हा अनेक कारणांनी वेगळा. एरवीच्या वारी सगळ्यांची एकत्र प्रार्थना होऊन शाळा सुरु होत असे. मात्र शनिवारी सकाळी उपासनेनी सुरुवात व्हायची. पाचवी ते सातवीची उपासना वरच्या उपासना मंदिरात तर आठवी ते दहावी खालच्या उपासना मंदिरात. असे का तर आठवी मध्ये विद्याव्रत संस्कार होत असे. तर ह्या उपासनेपूर्वी मौन बाळगणे अपेक्षित असे. त्यात मात्र फार गमतीजमती व्हायच्या. मुलींसाठी मौन पाळणे ही अधिकच कठीण गोष्ट. समोर आपली मैत्रीण दिसल्यावर काल संध्याकाळ ते आज सकाळमध्ये काय झालं हे अगदी ओठांवर येऊन थांबलेलं असे! सो कॉल्ड मौन पाळताना हातवारे करून सांगण्याच्या नादात काहीतरी मज्जा होत असे आणि मग हास्याचे फवारे उडत! साधारणतः २० मिनिटं चालणारी ही उपासना हळू हळू अंगवळणी पडत गेली. प्रबोधिनीची उपासना हा एक अतिशय सुंदर अनुभव असतो. इच्छा असल्यास आणि शक्य झाल्यास तो प्रत्येकाने जरूर घ्यावा.

पहिल्या काही दिवसांत वर्गात सूचना घेऊन ताराबाई आल्या – वर्षारंभ समारंभ आहे त्याचा शेवटच्या तासाला सराव असेल. तरी सर्वांनी वरच्या उपासना गृहात जमावं. ही कुठली उपासना? मग कळलं की प्रबोधिनीच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आणि शेवट अनुक्रमे वर्षारंभ आणि वर्षान्त समारंभाने होतो. आपण का शिकतो आहोत आपले उद्दिष्ट काय ह्याची जाणीव व्हावी ह्यासाठी वर्षारंभ आणि गेल्या वर्षांत आपण आपल्या उद्दिष्टाच्या किती जवळ पोचलो ह्याचे सिंहावलोकन करण्यासाठी वर्षान्त. वर्षारंभाला प्रत्येकाला एक स्वतःपुरता आणि एक वर्गाचा मिळून असा संकल्प करावा लागे. अर्थात काय संकल्प करायचा आणि तो कसा पूर्ण करायचा ह्याचं संपूर्ण स्वातंत्र्य होतं! प्रबोधिनीत अमर्याद स्वातंत्र्य दिलं जातं आणि त्याचा गैरवापर होणार नाही असा विश्वास देखील ठेवला जातो. शाळेत असताना हे स्वातंत्र्य आम्ही गृहीत धरून चाललो होतो! म्हणजे वर्ग चालू असताना वर्गातून आत बाहेर करण्याचं स्वातंत्र्य, कोणत्या भाषेत बोलावे, कोणी कुठे बसावं ह्याचं स्वातंत्र्य. वर्गातल्या टेबल खुर्च्यांची हवी तशी रचना करण्याचं स्वातंत्र्य (प्रबोधिनीत बाकं नाहीत. टेबल खुर्च्या आहेत. त्यामुळे हे सोपे जाते) आणि अजून अनेक गोष्टी. आमचे वर्गशिक्षक आम्हाला मदत करायचे पण अंतिम निर्णय मात्र मुलांचा असायचा. वर्षान्त समारंभाच्या वेळी वर्गातल्या प्रत्येकाने एक मनोगत लिहून द्यायचं असतं. अमेरिकेत teaching assistant म्हणून काम करताना सेमिस्टरच्या शेवटी जेव्हा मुलांचे course evaluation surveys घ्यायची वेळ आली तेव्हा हा उपक्रम आठवला! अरे हो, अजून एक वेगळी गोष्ट म्हणजे प्रबोधिनीत शिक्षिकांना ताई म्हणतात आणि शिक्षकांना सर किंवा दादा.

आमचा वर्ग वर्गाची रचना कशी असावी ह्याबाबत फार वेडा होता! सहावीत एकदा आम्हाला वाटले की खाली बसून चांगला अभ्यास होतो! मग काय उपासना मंदिरातून सतरंज्या घेऊन आलो. वर्गातली सगळी खुर्च्या टेबलं काढून टाकली आणि खाली बसलो! मग लक्षात आलं चपला बुटांमुळे फार कचरा येतो. मग चपला बूट वर्गाबाहेर रांगेने काढून ठेवणे, रोजच्या रोज वर्ग झाडणे, सतरंज्या झटकणे त्यांच्या घड्या घालणे ह्या सगळ्या कामांची जबाबदारी पण घेतली. एक महिनाभर अशी हौस फिटल्यावर पुन्हा टेबल खुर्च्या! टेबल खुर्च्यांच्या अभिनव रचना हा तर आमच्या वर्गाचा आवडता छंद! एकदा तर हॉटेलमध्ये एका टेबल भोवती चार खुर्च्या असतात ना तशी रचना केली होती. अर्थात ह्यात काही मुलींची फळ्याकडे पाठ होत होती! पण तासापुरतं खुर्ची फळ्याकडे करायची की झालं! मात्र ह्यावरून आम्हाला कधीही कोणीही ओरडलं नाही. अरे वा! आता हे असं करणार का? छान दिसतंय असं ऐकायला मिळायचं!

अभ्यासाव्यतिरिक्त शाळेत अनेक उपक्रमांची जंत्री असायची. पाचवीत आल्यावर वर्गाची ६ पथकांमध्ये विभागणी व्हायची. पथक म्हणजे इतर शाळांमध्ये जशी houses असतात तशी. मुलींच्या पथकाची सगळी नावं माझ्या लक्षात नाहीत पण मी पथक दोन म्हणजे राणी लक्ष्मीबाई पथकात होते. काही उपक्रम हे पथकशः व्हायचे. त्यामुळे आपल्या आधीच्या पाच आणि नंतरच्या पाच अश्या दहा वर्गातल्या किमान आपल्या पथकातल्या मुलींशी ओळख व्हायची. त्याचबरोबर प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी अनुक्रमे युवक आणि युवती विभागामधून शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवीत असतात. त्यामुळे यु.वि. आणि तिथल्या ताया आणि दादा हे फार म्हणजे फार लाडके! त्यांच्याबरोबर अभ्यास, खेळ, सहली, शिबिरं ह्या सगळ्या गोष्टी करायचो. अफाट धमाल!

तर अभ्यासेतर उपक्रमांची आधी ओळख करून देते मग त्यातल्या गमतीजमती. वर्गोदिष्ट पूर्ण करण्यासाठी त्याचा आठवड्यातून एक वेगळा तास असायचा. आमचं पाचवीचं वर्गोदिष्ट होतं – हस्ताक्षर सुंदर करणे! आम्ही शाळेत असताना राखीविक्री करायचो. आषाढी एकादशीला भजनाचा सुंदर कार्यक्रम होतो. त्याविषयी बरंच लिहण्यासारखं आहे. आषाढी झाली की गणपतीची धामधूम! मग मुलांची दिवाळीची फाटाकेविक्री. मग हिवाळी क्रीडा शिबीरं. पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी आहेतच. सकाळी प्रार्थनेनंतर दर रोज एका वर्गातून तीन जण सगळ्या शाळेसमोर भाषण करायचे. म्हणजे वर्षातून एकदा प्रत्येकाला एकदा अख्ख्या शाळेसमोर बोलावं लागायचं. अर्थात दर वर्षी प्रत्येक इयत्तेला काहीतरी नवीन असायचं. म्हणजे पाचवीत कविता, नाट्यछटा वगैरे. ह्याशिवाय दरवर्षी वर्गाचा एक सहाध्याय दिन असायचा. म्हणजे कोणत्या तरी ठिकाणी एक दिवसाची सहल. जर वर्गोदिष्ट पूर्ण करण्यासाठी कुठे जायचे असेल तर तसा सहाध्याय दिन आखता यायचा. आम्ही पाचवीत सहाध्याय दिनाला खेड शिवापूरचा प्रबोधिनीचा ग्रामोद्योग प्रकल्प पाहायला गेलो होतो. आपली शाळा नुसतीच शाळा नाहीये तर त्या पलीकडे बरंच काही आहे ह्याची पहिल्यांदा जाणीव त्या दिवशी झाली!

हे सगळं छान आहे पण अभ्यासाचं काय? तर हो अभ्यास असायचा आणि तो भरपूर असायचा. पण कधी उरावर बसायचा नाही. आता मागे वळून पाहताना वाटतं की प्रबोधिनीतलं पाचवीचं वर्ष हे दहावीपेक्षादेखील अधिक कठीण होतं. संपूर्ण मराठी माध्यमातून शिकलेल्या आम्हाला एका वर्षात CBSEच्या इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी समर्थ व्हायचं होतं. काही जण इंग्रजी माध्यमातले होते पण त्यांना एका वर्षात पूर्ण मराठी माध्यमाची मराठी भाषा शिकून आत्मसात करायची होती. त्याशिवाय संस्कृत, हिंदी आणि हिंदीतून सामाजिक शास्त्र! पण आम्हाला यशस्वी करायला आमचे शिक्षक खूप मेहनत घेत असत. इंग्रजी शिकवणाऱ्या स्मिता ताई, शास्त्र शिकवणाऱ्या शांतलाताई, गणिताचे जोशी सर, इतिहास शिकवायला गीतांजली ताई, मराठीला अनुराधाताई, हिंदीला चारुताताई आणि संस्कृतसाठी आमच्या वर्ग शिक्षिका असणाऱ्या भाग्यश्रीताई. शाळेत दर आठवड्याला एका विषयाची चाचणी परीक्षा असायची. प्रत्येक विषयाच्या एकूण तीन परीक्षा व्हायच्या. त्यामुळे अभ्यास असायचाच. पण त्याचा ताण यायचा नाही कारण शिक्षकांना असलेलं स्वातंत्र्य! अर्थात ते नुसतं स्वातंत्र्य नव्हतं, ती मोठी जबाबदारी होती हे आत्ता कळतंय.

आम्हाला भूगोल शिकवायला पोंक्षे सर होते. सर त्याचवर्षी प्रबोधिनीचे प्राचार्य झाले होते. तेव्हा जुळलेला ऋणानुबंध आजही कायम आहे! आम्हाला प्रत्येक वर्षी सरांनी काहीतरी विषय शिकवला. त्याचबरोबर सरांबरोबर आम्ही खूप मज्जा देखील केली! त्याच्या आठवणी येतीलच! तर आम्ही भूगोल क्रमिक पुस्तकातून शिकलोच नाही! म्हणजे असे काही एक पुस्तक नव्हते. एक नकाशांचे पुस्तक (atlas book) होते आणि एक पुस्तकांची सुंदर मालिका होती (त्याचं नाव मी साफ विसरले). त्यात प्रत्येक पुस्तकातला नायक एक दहा बारा वर्षांचा मुलगा असे जो एका विशिष्ठ भौगोलिक परिसरात राहायचा उदा. टुंड्रा, वाळवंट, आफ्रिकेची सदाहरित जंगलं. मग त्या पुस्तकात त्या मुलाच्या तोंडून त्याच्या एका वर्षाच्या जीवनक्रमाचे वर्णन असायचे. त्याचं आयुष्य कसं असतं, कोणते ऋतू असतात, ते काय जेवतात वगैरे. फार मजा यायची त्या गोष्टी वाचायला! शिवाय atlas च्या पुस्तकांतून आम्ही नकाशा कसा वाचायचा ते शिकलो. आणि मग परीक्षा? त्याची तर अजूनच मज्जा! म्हणजे कोणीतरी सरांना विचारायचं की “सर आता पुढच्या आठवड्यात भूगोलाची युनिट टेस्ट आहे.” सर म्हणायचे “बरं मग?” “मग सर पोर्शन काय असेल?” “पहिलीपासून त्या दिवसापर्यंत तुम्ही जो भूगोल शिकलात तेवढा!” झालं! मग काय अभ्यास आणि कसले २१ अपेक्षित! पेपरमधले प्रश्न आम्हाला माहिती किती ह्यापेक्षा आम्हाला किती कळलंय हे तपासणारे असायचे. अर्थात काही गोष्टी पाठ करायला लागायच्या म्हणजे लागयच्याच! त्यातली मुख्य म्हणजे स्पेलिंग्स! विज्ञान समजण्यासाठी लागणारी इंग्रजी स्पेलिंग्स शांतला ताईंनी आमच्याकडून अक्षरशः गिरवून घेतली आणि स्मिता ताईंनी इंग्रजीचं ग्रामर पक्कं करून घेतलं! जोशी सरांनी गणिताच्या टर्म्स पक्क्या करून घेतल्या (पण तरीही पाचवीत माझं गणित खूप कच्चं होतं! ते हळूहळू सुधारलं.)

आपोआप पाठ होणारी दुसरी सुंदर गोष्ट म्हणजे मराठीतल्या कविता. अनुराधा ताई हातचं न राखता शिकवायच्या! आम्हाला म्हणजे आमच्या वर्गाला कविता खूप आवडतात असं लक्षात आल्यावर त्यांनी अनेक सुंदर कविता आम्हाला अशाच शिकवल्या! कवितेच्या आनंदासाठी, परीक्षेसाठी नव्हे! त्यांच्यामुळे आम्हाला अवांतर वाचनाची गोडी लागली. मग पाचवीत ऑफ तासाला आम्ही ज्युल्स व्हर्नची भा.रा. भागवतांनी अनुवादित केलेली बरीचशी पुस्तकं वाचून काढली. हे सामुहिक वाचन असायचं. प्रबोधिनीचं ग्रंथालय खूप मोठं आहे. तिथे सगळ्या विद्यार्थ्यांना सगळी पुस्तकं हाताळता येतात. आमच्या वेळी अंजली ताई ग्रंथपाल होत्या. त्या खूप कडक शिस्तीच्या आहेत असा त्यांचा दरारा! पहिल्याच आठवड्यात त्यांनी वर्गात येऊन सगळ्या सूचना दिल्या होत्या. खरं तर मी पुस्तकवेडी पण का कोण जाणे मला एकटीला जायची भीती वाटली आणि म्हणून मी माझं ग्रंथालयाचं कार्ड बनवलंच नाही. साधारण महिन्यानंतर अंजली ताईंनी माझ्यासाठी वर्गात निरोप पाठवला. मी घाबरत घाबरत गेले पण त्यांनी कार्डाचा विषय काढलाच नाही. उलट आपुलकीने तुला पुस्तकं आवडतात का? कोणती? मग आपल्याकडे कोणती पुस्तकं आहेत असं छान गप्पा मारायला सुरुवात केली. मग तुला ह्यातलं कोणतं पुस्तक हवंय का? असं करत माझं कार्ड बनवून मला सगळं नीट समजावून दिलं! मग काय त्यानंतर रोज एक ग्रंथालयाची फेरी सुरु!


आम्ही पाचवीत असताना प्रबोधिनीने जाणता राजा ह्या नाटकाचे निधी संकलनासाठी प्रयोग लावले होते. मला वाटतं सोलापूरची प्रबोधिनीची वास्तू उभारण्यासाठी. त्याची तिकीट विक्री करण्यासाठी आम्ही अक्षरशः घरोघरी हिंडलो होतो! आमची संवादाची सगळी कौशल्य पणाला लावली होती. शाळेच्या वेळात, शाळेबाहेर जाऊन आपले आपण काहीतरी करू शकतो ही फार मोठी गोष्ट वाटली होती. तेव्हा एकदा मी तिकिटांचे एकूण १० हजार रुपये एकटी दप्तरातून घेऊन शाळेत गेले होते. त्यातून माझा आत्मविश्वास खूप वाढला एवढं पक्कं लक्षात आहे. पाचवीच्या आणखी बऱ्याच आठवणी आहेत. पण आत्ता इथे थांबते. खूप मोठी पोस्ट झाली!