पुण्यातल्या आणि काही वेळा पुण्याबाहेरच्या
शाळांमधून चौथीपर्यंत शिकलेली मुलामुली जेव्हा प्रबोधिनीत येतात तेव्हा काहीही कळत
नसतं! निदान मला तरी कळत नव्हतं! त्यातून मी खोपोलीसारख्या छोट्या गावातल्या
शाळेतून आल्याने माझ्या कोणीच मैत्रिणी नव्हत्या. माझ्या वर्गात पुण्यातल्या एकाच
शाळेतून आल्यामुळे एकमेकींना ओळखणाऱ्या मुली होत्या. पण काहीच दिवसांत आम्ही
सगळ्याच इतक्या घट्ट मैत्रिणी झालो की आम्ही काही महिन्यांपूर्वी एकमेकींना ओळखत
देखील नव्हतो हे कोणाला खरं वाटणार नाही! शाळा एकदम आपली वाटायला लागली. इतकी की तुझ्या
आधीच्या शाळेचं नाव काय असं विचारल्यावर एकदा मी चुकून प्रबोधिनी असं उत्तर दिलं
होतं!
शाळेच्या पहिल्याच दिवशी आम्हाला पद्य शिकवायला नववी
दहावीच्या ताया आल्या होत्या. त्यांनी “प्रबोधिनीत यायचे समर्थ व्हायला समर्थ
मायभूमीला जगी करायला!” हे पद्य शिकवलं आणि आपण प्रबोधिनीत का आलो ह्याचं उत्तर मिळालं!
शिकता शिकता पद्य पाठ होतात असंही आम्हाला लगेच लक्षात आलं (किंबहुना ती तशीच पाठ
करायची असतात. एक कडवं शिकायचं, म्हणायचं आणि मग दुसरं कडवं शिकायचं, मग पहिलं आणि
दुसरं एकदम म्हणायचं! असं करत करत पद्य पाठ होतं!) ही खास प्रबोधिनीची गाणी!
शाळेतल्याच आजी माजी लोकांनी रचलेली, (मात्र कोणत्याच पद्याखाली कवी/कवयित्री चे
नाव नसलेली), देशभक्तीची स्फूर्तीदायी पद्य! ह्या ना त्या निमित्ताने ही पद्य
शिकवली, म्हटली जातात आणि फार प्रेमाने म्हटली जातात. गंमत अशी की ह्यातल्या एक
दोन पद्यांच्या चाली ह्या जुन्या हिंदी गाण्यावरून घेतल्या आहेत. पण जर त्यावेळी
मला हे कोणी सांगितलं असतं तर ह्या चाली मूळ प्रबोधिनीच्या होत्या आणि मग त्या
सिनेमावाल्यांनी चोरल्या असं मला वाटलं असतं! इतकी त्या गाण्यांची क्रेझ होती!
ह्या पाठांतरावरून आठवलं की आमचा पाचवीचा पहिला
तास शिकवायला दादा नवाथे आले होते. ऋषितुल्य व्यक्तिमत्व! आप्पांची शाळेची
संकल्पना ऐकून त्यासाठी शाळेच्या उभारणीमध्ये योगदान द्यायला स्वतःहून सहभागी
झालेले हाडाचे शिक्षक. ते वर्गावर आले आणि आल्याआल्या फळ्यावर हा श्लोक लिहिला.
पुस्तकस्था तु या विद्या, परहस्तगतं धनम्|
कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तद धनम्||
आम्हाला ह्या श्लोकाचा अर्थ समजावला. श्लोक पाठ
करून घेतला आणि फळा पुसून टाकला! म्हणाले असंच शिकायचं! त्यावेळी आम्हाला का ही ही कळलं नाही. श्लोक
मात्र आजही पाठ आहे आणि आता त्याचा अर्थ नीटच कळतोय!
शाळा सुरु झाली आणि रोजच काही ना काही नवीन घडायला
लागलं! एकतर शाळेचा गणवेश रोज नाही! फक्त शनिवारी जेव्हा अर्ध्या दिवसाची आणि
सकाळची शाळा असते तेव्हा. शनिवार हा अनेक कारणांनी वेगळा. एरवीच्या वारी सगळ्यांची
एकत्र प्रार्थना होऊन शाळा सुरु होत असे. मात्र शनिवारी सकाळी उपासनेनी सुरुवात व्हायची.
पाचवी ते सातवीची उपासना वरच्या उपासना मंदिरात तर आठवी ते दहावी खालच्या उपासना मंदिरात.
असे का तर आठवी मध्ये विद्याव्रत संस्कार होत असे. तर ह्या उपासनेपूर्वी मौन
बाळगणे अपेक्षित असे. त्यात मात्र फार गमतीजमती व्हायच्या. मुलींसाठी मौन पाळणे ही
अधिकच कठीण गोष्ट. समोर आपली मैत्रीण दिसल्यावर काल संध्याकाळ ते आज सकाळमध्ये काय
झालं हे अगदी ओठांवर येऊन थांबलेलं असे! सो कॉल्ड मौन पाळताना हातवारे करून
सांगण्याच्या नादात काहीतरी मज्जा होत असे आणि मग हास्याचे फवारे उडत! साधारणतः २०
मिनिटं चालणारी ही उपासना हळू हळू अंगवळणी पडत गेली. प्रबोधिनीची उपासना हा एक
अतिशय सुंदर अनुभव असतो. इच्छा असल्यास आणि शक्य झाल्यास तो प्रत्येकाने जरूर
घ्यावा.
पहिल्या काही दिवसांत वर्गात सूचना घेऊन ताराबाई
आल्या – वर्षारंभ समारंभ आहे त्याचा शेवटच्या तासाला सराव असेल. तरी सर्वांनी वरच्या
उपासना गृहात जमावं. ही कुठली उपासना? मग कळलं की प्रबोधिनीच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात
आणि शेवट अनुक्रमे वर्षारंभ आणि वर्षान्त समारंभाने होतो. आपण का शिकतो आहोत आपले
उद्दिष्ट काय ह्याची जाणीव व्हावी ह्यासाठी वर्षारंभ आणि गेल्या वर्षांत आपण आपल्या
उद्दिष्टाच्या किती जवळ पोचलो ह्याचे सिंहावलोकन करण्यासाठी वर्षान्त. वर्षारंभाला
प्रत्येकाला एक स्वतःपुरता आणि एक वर्गाचा मिळून असा संकल्प करावा लागे. अर्थात काय
संकल्प करायचा आणि तो कसा पूर्ण करायचा ह्याचं संपूर्ण स्वातंत्र्य होतं!
प्रबोधिनीत अमर्याद स्वातंत्र्य दिलं जातं आणि त्याचा गैरवापर होणार नाही असा
विश्वास देखील ठेवला जातो. शाळेत असताना हे स्वातंत्र्य आम्ही गृहीत धरून चाललो
होतो! म्हणजे वर्ग चालू असताना वर्गातून आत बाहेर करण्याचं स्वातंत्र्य, कोणत्या
भाषेत बोलावे, कोणी कुठे बसावं ह्याचं स्वातंत्र्य. वर्गातल्या टेबल खुर्च्यांची हवी
तशी रचना करण्याचं स्वातंत्र्य (प्रबोधिनीत बाकं नाहीत. टेबल खुर्च्या आहेत.
त्यामुळे हे सोपे जाते) आणि अजून अनेक गोष्टी. आमचे वर्गशिक्षक आम्हाला मदत करायचे
पण अंतिम निर्णय मात्र मुलांचा असायचा. वर्षान्त समारंभाच्या वेळी वर्गातल्या
प्रत्येकाने एक मनोगत लिहून द्यायचं असतं. अमेरिकेत teaching assistant म्हणून काम
करताना सेमिस्टरच्या शेवटी जेव्हा मुलांचे course evaluation surveys घ्यायची वेळ
आली तेव्हा हा उपक्रम आठवला! अरे हो, अजून एक वेगळी गोष्ट म्हणजे प्रबोधिनीत
शिक्षिकांना ताई म्हणतात आणि शिक्षकांना सर किंवा दादा.
आमचा वर्ग वर्गाची रचना कशी असावी ह्याबाबत फार
वेडा होता! सहावीत एकदा आम्हाला वाटले की खाली बसून चांगला अभ्यास होतो! मग काय उपासना
मंदिरातून सतरंज्या घेऊन आलो. वर्गातली सगळी खुर्च्या टेबलं काढून टाकली आणि खाली
बसलो! मग लक्षात आलं चपला बुटांमुळे फार कचरा येतो. मग चपला बूट वर्गाबाहेर रांगेने
काढून ठेवणे, रोजच्या रोज वर्ग झाडणे, सतरंज्या झटकणे त्यांच्या घड्या घालणे ह्या
सगळ्या कामांची जबाबदारी पण घेतली. एक महिनाभर अशी हौस फिटल्यावर पुन्हा टेबल
खुर्च्या! टेबल खुर्च्यांच्या अभिनव रचना हा तर आमच्या वर्गाचा आवडता छंद! एकदा तर
हॉटेलमध्ये एका टेबल भोवती चार खुर्च्या असतात ना तशी रचना केली होती. अर्थात
ह्यात काही मुलींची फळ्याकडे पाठ होत होती! पण तासापुरतं खुर्ची फळ्याकडे करायची की
झालं! मात्र ह्यावरून आम्हाला कधीही कोणीही ओरडलं नाही. अरे वा! आता हे असं करणार का?
छान दिसतंय असं ऐकायला मिळायचं!
अभ्यासाव्यतिरिक्त शाळेत अनेक उपक्रमांची जंत्री
असायची. पाचवीत आल्यावर वर्गाची ६ पथकांमध्ये विभागणी व्हायची. पथक म्हणजे इतर शाळांमध्ये
जशी houses असतात
तशी. मुलींच्या पथकाची सगळी नावं माझ्या लक्षात नाहीत पण मी पथक दोन म्हणजे राणी
लक्ष्मीबाई पथकात होते. काही उपक्रम हे पथकशः व्हायचे. त्यामुळे आपल्या आधीच्या पाच
आणि नंतरच्या पाच अश्या दहा वर्गातल्या किमान आपल्या पथकातल्या मुलींशी ओळख
व्हायची. त्याचबरोबर प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी अनुक्रमे युवक आणि
युवती विभागामधून शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवीत असतात. त्यामुळे
यु.वि. आणि तिथल्या ताया आणि दादा हे फार म्हणजे फार लाडके! त्यांच्याबरोबर
अभ्यास, खेळ, सहली, शिबिरं ह्या सगळ्या गोष्टी करायचो. अफाट धमाल!
तर अभ्यासेतर उपक्रमांची आधी ओळख करून देते मग
त्यातल्या गमतीजमती. वर्गोदिष्ट पूर्ण करण्यासाठी त्याचा आठवड्यातून एक वेगळा तास
असायचा. आमचं पाचवीचं वर्गोदिष्ट होतं – हस्ताक्षर सुंदर करणे! आम्ही शाळेत असताना
राखीविक्री करायचो. आषाढी एकादशीला भजनाचा सुंदर कार्यक्रम होतो. त्याविषयी बरंच
लिहण्यासारखं आहे. आषाढी झाली की गणपतीची धामधूम! मग मुलांची दिवाळीची फाटाकेविक्री.
मग हिवाळी क्रीडा शिबीरं. पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी आहेतच. सकाळी
प्रार्थनेनंतर दर रोज एका वर्गातून तीन जण सगळ्या शाळेसमोर भाषण करायचे. म्हणजे
वर्षातून एकदा प्रत्येकाला एकदा अख्ख्या शाळेसमोर बोलावं लागायचं. अर्थात दर वर्षी
प्रत्येक इयत्तेला काहीतरी नवीन असायचं. म्हणजे पाचवीत कविता, नाट्यछटा वगैरे. ह्याशिवाय
दरवर्षी वर्गाचा एक सहाध्याय दिन असायचा. म्हणजे कोणत्या तरी ठिकाणी एक दिवसाची
सहल. जर वर्गोदिष्ट पूर्ण करण्यासाठी कुठे जायचे असेल तर तसा सहाध्याय दिन आखता
यायचा. आम्ही पाचवीत सहाध्याय दिनाला खेड शिवापूरचा प्रबोधिनीचा ग्रामोद्योग
प्रकल्प पाहायला गेलो होतो. आपली शाळा नुसतीच शाळा नाहीये तर त्या पलीकडे बरंच
काही आहे ह्याची पहिल्यांदा जाणीव त्या दिवशी झाली!
हे सगळं छान आहे पण अभ्यासाचं काय? तर हो अभ्यास
असायचा आणि तो भरपूर असायचा. पण कधी उरावर बसायचा नाही. आता मागे वळून पाहताना
वाटतं की प्रबोधिनीतलं पाचवीचं वर्ष हे दहावीपेक्षादेखील अधिक कठीण होतं. संपूर्ण
मराठी माध्यमातून शिकलेल्या आम्हाला एका वर्षात CBSEच्या इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी
समर्थ व्हायचं होतं. काही जण इंग्रजी माध्यमातले होते पण त्यांना एका वर्षात पूर्ण
मराठी माध्यमाची मराठी भाषा शिकून आत्मसात करायची होती. त्याशिवाय संस्कृत, हिंदी
आणि हिंदीतून सामाजिक शास्त्र! पण आम्हाला यशस्वी करायला आमचे शिक्षक खूप मेहनत
घेत असत. इंग्रजी शिकवणाऱ्या स्मिता ताई, शास्त्र शिकवणाऱ्या शांतलाताई, गणिताचे
जोशी सर, इतिहास शिकवायला गीतांजली ताई, मराठीला अनुराधाताई, हिंदीला चारुताताई
आणि संस्कृतसाठी आमच्या वर्ग शिक्षिका असणाऱ्या भाग्यश्रीताई. शाळेत दर आठवड्याला एका
विषयाची चाचणी परीक्षा असायची. प्रत्येक विषयाच्या एकूण तीन परीक्षा व्हायच्या. त्यामुळे
अभ्यास असायचाच. पण त्याचा ताण यायचा नाही कारण शिक्षकांना असलेलं स्वातंत्र्य!
अर्थात ते नुसतं स्वातंत्र्य नव्हतं, ती मोठी जबाबदारी होती हे आत्ता कळतंय.
आम्हाला भूगोल शिकवायला पोंक्षे सर होते. सर
त्याचवर्षी प्रबोधिनीचे प्राचार्य झाले होते. तेव्हा जुळलेला ऋणानुबंध आजही कायम आहे!
आम्हाला प्रत्येक वर्षी सरांनी काहीतरी विषय शिकवला. त्याचबरोबर सरांबरोबर आम्ही
खूप मज्जा देखील केली! त्याच्या आठवणी येतीलच! तर आम्ही भूगोल क्रमिक पुस्तकातून
शिकलोच नाही! म्हणजे असे काही एक पुस्तक नव्हते. एक नकाशांचे पुस्तक (atlas
book) होते आणि
एक पुस्तकांची सुंदर मालिका होती (त्याचं नाव मी साफ विसरले). त्यात प्रत्येक
पुस्तकातला नायक एक दहा बारा वर्षांचा मुलगा असे जो एका विशिष्ठ भौगोलिक परिसरात
राहायचा उदा. टुंड्रा, वाळवंट, आफ्रिकेची सदाहरित जंगलं. मग त्या पुस्तकात त्या
मुलाच्या तोंडून त्याच्या एका वर्षाच्या जीवनक्रमाचे वर्णन असायचे. त्याचं आयुष्य
कसं असतं, कोणते ऋतू असतात, ते काय जेवतात वगैरे. फार मजा यायची त्या गोष्टी
वाचायला! शिवाय atlas च्या
पुस्तकांतून आम्ही नकाशा कसा वाचायचा ते शिकलो. आणि मग परीक्षा? त्याची तर अजूनच
मज्जा! म्हणजे कोणीतरी सरांना विचारायचं की “सर आता पुढच्या आठवड्यात भूगोलाची युनिट
टेस्ट आहे.” सर म्हणायचे “बरं मग?” “मग सर पोर्शन काय असेल?” “पहिलीपासून त्या
दिवसापर्यंत तुम्ही जो भूगोल शिकलात तेवढा!” झालं! मग काय अभ्यास आणि कसले २१
अपेक्षित! पेपरमधले प्रश्न आम्हाला माहिती किती ह्यापेक्षा आम्हाला किती कळलंय हे
तपासणारे असायचे. अर्थात काही गोष्टी पाठ करायला लागायच्या म्हणजे लागयच्याच!
त्यातली मुख्य म्हणजे स्पेलिंग्स! विज्ञान समजण्यासाठी लागणारी इंग्रजी स्पेलिंग्स
शांतला ताईंनी आमच्याकडून अक्षरशः गिरवून घेतली आणि स्मिता ताईंनी इंग्रजीचं ग्रामर
पक्कं करून घेतलं! जोशी सरांनी गणिताच्या टर्म्स पक्क्या करून घेतल्या (पण तरीही पाचवीत
माझं गणित खूप कच्चं होतं! ते हळूहळू सुधारलं.)
आपोआप पाठ होणारी दुसरी सुंदर गोष्ट म्हणजे
मराठीतल्या कविता. अनुराधा ताई हातचं न राखता शिकवायच्या! आम्हाला म्हणजे आमच्या
वर्गाला कविता खूप आवडतात असं लक्षात आल्यावर त्यांनी अनेक सुंदर कविता आम्हाला
अशाच शिकवल्या! कवितेच्या आनंदासाठी, परीक्षेसाठी नव्हे! त्यांच्यामुळे आम्हाला
अवांतर वाचनाची गोडी लागली. मग पाचवीत ऑफ तासाला आम्ही ज्युल्स व्हर्नची भा.रा.
भागवतांनी अनुवादित केलेली बरीचशी पुस्तकं वाचून काढली. हे सामुहिक वाचन असायचं. प्रबोधिनीचं
ग्रंथालय खूप मोठं आहे. तिथे सगळ्या विद्यार्थ्यांना सगळी पुस्तकं हाताळता येतात.
आमच्या वेळी अंजली ताई ग्रंथपाल होत्या. त्या खूप कडक शिस्तीच्या आहेत असा त्यांचा
दरारा! पहिल्याच आठवड्यात त्यांनी वर्गात येऊन सगळ्या सूचना दिल्या होत्या. खरं तर
मी पुस्तकवेडी पण का कोण जाणे मला एकटीला जायची भीती वाटली आणि म्हणून मी माझं
ग्रंथालयाचं कार्ड बनवलंच नाही. साधारण महिन्यानंतर अंजली ताईंनी माझ्यासाठी
वर्गात निरोप पाठवला. मी घाबरत घाबरत गेले पण त्यांनी कार्डाचा विषय काढलाच नाही.
उलट आपुलकीने तुला पुस्तकं आवडतात का? कोणती? मग आपल्याकडे कोणती पुस्तकं आहेत असं
छान गप्पा मारायला सुरुवात केली. मग तुला ह्यातलं कोणतं पुस्तक हवंय का? असं करत
माझं कार्ड बनवून मला सगळं नीट समजावून दिलं! मग काय त्यानंतर रोज एक ग्रंथालयाची
फेरी सुरु!
आम्ही पाचवीत असताना प्रबोधिनीने जाणता राजा ह्या
नाटकाचे निधी संकलनासाठी प्रयोग लावले होते. मला वाटतं सोलापूरची प्रबोधिनीची
वास्तू उभारण्यासाठी. त्याची तिकीट विक्री करण्यासाठी आम्ही अक्षरशः घरोघरी हिंडलो
होतो! आमची संवादाची सगळी कौशल्य पणाला लावली होती. शाळेच्या वेळात, शाळेबाहेर
जाऊन आपले आपण काहीतरी करू शकतो ही फार मोठी गोष्ट वाटली होती. तेव्हा एकदा मी
तिकिटांचे एकूण १० हजार रुपये एकटी दप्तरातून घेऊन शाळेत गेले होते. त्यातून माझा
आत्मविश्वास खूप वाढला एवढं पक्कं लक्षात आहे. पाचवीच्या आणखी बऱ्याच आठवणी आहेत.
पण आत्ता इथे थांबते. खूप मोठी पोस्ट झाली!
No comments:
Post a Comment