आम्हाला सातवीत विशाखा ताई वर्ग शिक्षिका म्हणून
हव्या होत्या पण सातवीत शाळा सुरु झाली तेव्हा समजलं की विशाखा ताई रत्नागिरीला राहायला
गेल्यामुळे शाळेत शिकवू शकणार नव्हत्या. विशाखा ताई नाहीत ह्याचं भयंकर वाईट वाटतंच
होतं पण त्यांनी आपल्याला ह्याबद्दल सांगितलं नाही याचं पण जाम वाईट वाटत होतं! पण
काय करता! सातवीत आम्हाला शिकवायला मुकुलिका ताई आल्या. त्याची आठवण म्हणजे त्यांनी
त्यांचा पहिला तास आमच्या वर्गावर घेतला. तो तास म्हणजे मुकुलिका ताईंची मुलाखत
होती. त्या तासाला दादा (नवाथे) वर्गात शेवटच्या बाकावर बसले होते परीक्षण करायला
आणि ताईंनी आम्हाला Pythagoras theorem
शिकवला
होता!
आम्हाला इतिहासासाठी पाचवी ते सातवी प्रबोधिनीने
तयार केलेली इतिहासाची पुस्तके होती. सातवीत सुचेता ताई इतिहास शिकवायला होत्या. “गाथा इतिहास की,
प्रज्ञाभरे साहस की” असं त्यांनीच
लिहिलेलं पुस्तक होतं. ह्यात आम्ही विविध
भारतीय साम्राज्यांचा इतिहास शिकलो. ज्यात चोल, मौर्य इत्यादी प्राचीन घराणी ते पेशवे,
राजपूत, शीख आदींचा
समावेश होता. त्याच बरोबर प्राचीन भारतातले विद्वान चरक, सुश्रुत, आर्यभट्ट आदींची
देखील ओळख होती. जेव्हा आम्ही शिखांचा
इतिहास शिकत होतो तेव्हा आम्ही गुरुद्वारा बघायला गेलो होतो. तिथे गेल्यावर फार
शांत वाटलं होतं. आमच्या आधीच्या एका मुलांच्या तुकडीने जेव्हा गुरुद्वाराला भेट
दिली होती तेव्हा त्यांनी गुरु ग्रंथ साहिब सन्मानाने उच्च स्थानी ठेवलेला पाहिला.
आमच्या वेळी प्रबोधिनीमध्ये रोज प्रार्थनेनंतर गीता आणि गीताईचे चार श्लोक आम्ही म्हणायचो.
अर्थात प्रार्थनेला उभं राहताना गीता गीताई पायांपाशी ठेवावी लागायची. मात्र
गुरुद्वारा मध्ये गुरु ग्रंथ साहिब उच्च स्थानी पाहून त्या तुकडीतल्या मुलांना
वाटले की आपण प्रार्थनेच्या वेळी गीता गीताई पायाशी ठेवतो ते योग्य नाही. मग
त्यांनी विचार केला आणि गीता गीताई ठेवण्यासाठी एक गळ्यात अडकवता येईल अशी छोटीशी
पिशवी तयार केली आणि त्यांच्या वर्गाने वापरायला सुरुवात केली. आम्हाला सुचेता ताईंनी
ही गोष्ट सांगितल्यावर आम्हाला पण ती पटली. मग वर्गातल्या एकीच्या ओळखीने आम्ही ही
वर्गासाठी तश्या पिशव्या शिवल्या आणि वापरायला सुरुवात केली. अर्थात नंतर ही
कल्पना शाळेने लगेच उचलून धरली आणि शाळेत सगळ्यांना तशा गीता गीताई ठेवण्याच्या
पिशव्या वाटण्यात आल्या! आज मागे वळून बघताना शाळेचं फार कौतुक वाटतं! शाळेची
धोरणं आणि नियम शिथिल नव्हते पण लवचिक होते त्यामुळे तुम्ही कोणीही असा तुमच्या
उत्तम कल्पना लगेच अंमलात आणल्या जात असत!
मला आठवतंय की पंजाबच्या इतिहासाने आम्ही
बऱ्यापैकी भारावून गेलो होतो. त्यातूनच मग स्वामी दयानंद सरस्वती ह्यांच्या
जीवनावर आम्ही एक नाटक केलं. म्हणजे लिहिणे, बसवणे आणि अभिनय सबकुछ आम्हीच. त्या नाटकात
लागणारी एक शंकराची शाडूची पिंड देखील आम्हीच बनवली होती. वर्गात आम्ही ३६ जणी.
नाटक असं लिहिलं होतं की प्रत्येकीच्या वाट्याला काहीतरी वाक्य येईल! ह्या
नाटकासाठी स्टेज म्हणून जे वापरणार होतो ते नेहमी खालच्या उपासना मंदिरात असायचं. पण
नाटक तर वरच्या उपासना मंदिरात करणार होतो. मग काय सगळ्यांनी मिळून ते जड स्टेज
चार मजले चढवून वर नेलं आणि नाटक झाल्यावर पुन्हा खाली जागी आणून ठेवलं.
आम्हाला भूगोल शिकवायला नीलिमा ताई होत्या.
सातवीत आम्ही युरोपचा भूगोल शिकत होतो. त्यातला सगळ्यात मजेचा भाग म्हणजे नीलिमा
ताई युरोपच्या बऱ्याच देशांत फिरून आल्या होत्या त्यामुळे त्यांच्या तोंडून युरोपचं
वर्णन आणि त्यांनी काढलेले फोटो पाहत आम्ही भूगोल शिकलो. मजा आली. ह्याशिवाय युरोप
मधला एक एक देश निवडून गटाने मिळून त्यावर प्रकल्प देखील केला. माझ्या ग्रुपने ऑस्ट्रीया
देशावर प्रकल्प केला होता. त्याबद्दल encyclopedia मध्ये तिथे Right to Education act
आहे आणि तो अजून
आपल्याकडे नाही हे वाचल्यावर ह्यावर चर्चा केली होती. अजून एक असं की त्याच वेळी
हा right to education act पास व्हावा म्हणून पुण्यातल्या संस्थांनी एक भव्य
मोर्चा काढला होता. त्यात आमचा वर्ग सहभागी झाला होता. त्या मोर्च्याची सांगता
शनिवार वाड्यावर झाली होती. आता इतक्या वर्षांनी त्याच कायद्याखाली प्रबोधिनीला कोर्टात
जावे लागले असं कळल्यावर हे सगळं आठवलं! पण हे सगळं विषयांतर! ह्या आठवणीतला
महत्वाचा शब्द आहे प्रकल्प! तुम्ही कोणत्याही प्रबोधिनीच्या विद्यार्थ्याशी १५
मिनिटांच्यावर प्रबोधिनीविषयी बोलत राहिलात तर हा शब्द येणारच याची गॅरंटी!
प्रकल्प हा प्रबोधिनीच्या शिक्षणाचा अविभाज्य भाग आहे. कोणत्याही विषयाची मुळातून
गोडी लागायची असेल तर त्यात काहीतरी कल्पक करून पाहिले पाहिजे. म्हणून मग आम्ही
सगळ्या विषयांत प्रकल्प करायचो!
आमचा सातवीचा सहाध्याय दिन खरोखरीचा सहाध्याय दिन
होता! म्हणजे आठवी आणि नववीच्या मुली त्यावेळी वर्गोद्दीष्ट म्हणून शिल्पकलेचा
अभ्यास करत होत्या. त्यासाठी त्यांनी field visits म्हणून पुण्यातली बरीचशी देवळं हिंडून
पाहीली होती. त्यांच्या बरोबर मार्गदर्शन करायला वर्गातल्याच एका विद्यार्थिनीचे
बाबा (जे शिल्पकलेचे अभ्यासक होते) असायचे. त्यांच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून ते दोन्ही
वर्ग औरंगाबाद आणि वेरूळला जाणार होते. ह्या सगळ्यात आमच्या वर्गाची वर्णी कशी लागली
कोणास ठाऊक! पण तीनही वर्गातल्या मुली मिळून ३/४ दिवस मस्त मज्जा केली. एकतर
कुठेही एकत्र प्रवास करायचा म्हणजे आमचे घसे बसलेच पाहिजेत! कारण नुसता प्रवास
करायचा नाही तर गाणी म्हणत करायचा असं तत्वच! आम्हाला इतक्या कविता, गाणी आणि अभंग
येत होते की फिल्मी गाणी कधी म्हटलीच नाहीत! आणि अशा सहली म्हणजे नवीन गाणी
शिकण्याचा चान्स! एकदा एका बस ड्रायव्हरने आम्हाला खाली उतरवण्याची धमकी दिली
तेव्हाच आम्ही गप्प बसलो होतो! एकूण वेरूळ ट्रीप मध्ये खूप मजा आली. एका
अभ्यासकाच्या नजरेतून कैलास मंदिरातली शिल्पं पाहायला मिळाली. त्यातील काही वर्णनं
मनावर कोरली गेली आहेत आणि आजही स्पष्ट आठवतात! मूर्तीचं अनेकवचन मूर्तीच होतं हा
शिकलेला पहिला धडा. थंडीच्या दिवसांत गेल्याने बरेच काकडलो होतो हे पण लक्षात आहे!
एक दिवस मुकुलिका ताई वर्गात आल्या आणि
म्हणाल्या, “पहा, तुम्हाला भेटायला कोण आलंय!” आणि दारातून विशाखा ताई आत आल्या!
मग काय काही वेळ वर्गात नुसता गोंधळ, रडारड, हसू आणि मज्जा! “तुम्ही आमचा निरोप न
घेता का गेलात?” असं विचारल्यावर ताई म्हणाल्या की, “मला सांगणं अवघड वाटलं!” आता
वाटतं की खरंच अवघड होतं सांगणं. पण ही अचानक, अनपेक्षित भेट त्यामुळेच खूप लक्षात
आहे!
सातवीत आम्हाला Media awareness नावाचा एक विषय
होता. त्यात आम्ही वेगवेगळ्या माध्यमांविषयी माहिती मिळवायचो. गीतांजली ताई (दाते)
शिकवायची. त्यात आम्ही तिच्याबरोबर खूप साऱ्या चांगल्या फिल्म्स पाहिल्या. शनिवारी
शेवटचा तास असायचा. आम्ही ह्या फिल्म्स पाहायला दृक्श्राव्य कक्षात जायचो. ही एक
छोटीशी खोली होती जिथे पडदे लाऊन पूर्ण अंधार करता यायचा. एक विमानाच्या
सुरुवातीच्या दिवसांच्या स्पर्धेची गोष्ट सांगणारा जुना इंग्रजी सिनेमा पाहिला
होता. त्यात एक विमानांची स्पर्धा होणार असते आणि जिंकणाऱ्याशी एका राजकन्येचं
लग्न होणार असतं. तो बघताना पोट धरून हसलो होतो. जुमान्जी पण पाहिला होता. तो
संपायच्या आधी शाळा सुटली. पण आम्ही सिनेमा बघण्यात इतके दंग होतो की आम्ही ठरवलं
की सिनेमा संपवूनच घरी जायचं! (एव्हाना पालकांना सवय झाली होती. मुलगी एकदा
प्रबोधिनीत गेली की यायची वेळ फिक्स नसते!). पुढचा सगळा सिनेमा पाहिला आणि मग घरी
गेलो. ह्या विषयातही प्रकल्प होताच! मी वृत्तपत्रातून प्रसिद्ध होणाऱ्या
पुरस्काराच्या बातम्या असा विषय घेतला होता. दोन पेपर निवडून एका महिन्यात कोणत्या
पुरस्काराच्या, किती आणि कुठल्या पानावर बातम्या छापल्या जातात ह्याचं सर्वेक्षण
करायचं होतं. माझ्या आसपास सगळ्यांकडे सकाळच येत होता. मग मी केसरी वाड्यात
केसरीच्या कार्यालयात गेले आणि त्यांची परवानगी मागून केसरीचे एका महिन्याचे अंक
तिथे बसून चाळले. (आता वाटतं किती दूरदृष्टीने निवडला होता मी माझा विषय!)
नवनवीन गोष्टींची ओळख करून घेणे हे चालूच असायचं.
तेव्हा पेजर हा प्रकार नुकताच लोकप्रिय होऊ लागला होता. मग आमच्या वर्गातल्या
एकीच्या वडिलांनी येऊन आम्हाला पेजर कसा वापरायचा, त्याचे काम कसे चालते अशी सगळी
माहिती दिली होती. त्याच वेळी मग इंटरनेट, इमेल, मोबाईल हे सगळे शब्द ओळखीचे झाले.
सातवीत आम्ही पहिल्यांदा शाळेच्या गणपती
विसर्जनाच्या मिरवणुकीत खऱ्या अर्थाने सहभागी झालो! आमचा बोथाटीचा गट होता. बोथाटी
म्हणजे दोन्हीकडे टोकदार सळ्या असलेली बारीक लाकडी काठी. हे एका प्रकारचं शस्त्र
आहे. अर्थात आमच्या बोथाटीच्या दोन्ही टोकांना झिरमिळ्या होत्या! पण ढोलाच्या
तालावर बोथाटी फिरवणे आणि शिस्तबद्ध हालचाली करणे ह्याची मजा कळली! शाळेचा गणेशोत्सव
म्हणजे काय धमाल असते हे कळायला लागलं होतं! केवळ गणपतीतल्या अनुभवांवर पानंच्या
पानं लिहिता येतील! ह्याशिवाय सातवीत आम्ही एका वेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती
परीक्षेला बसलो होतो. त्यात एक परीक्षा अशी नव्हती पण विविध नवीन कौशल्यं शिकायची
होती – पुस्तक परीक्षण ते सायकलचे पंक्चर काढणे अशी वेगवेगळी कौशल्यं. पण खरं
सांगायचं तर मला ह्याबद्दल फारश्या आठवणी लक्षात नाहीत! It did not stick
very well. सातवीत अजून एक गोष्ट झाली की आमचे आणि इंग्रजीच्या
ताईंचे काही फारसे पटले नाही. सहामाही नंतर स्मिता ताई त्यांच्या बाळंतपणाच्या
रजेवर गेल्या आणि नंतर ज्या ताई आल्या त्यांचे शिकवणे आम्हाला मुळीच आवडले नाही.
मग एक दुसऱ्या ताई आल्या पण तेही जमेना. मग काय शेवटी पोंक्षे सर आले आणि म्हणाले
काय करायचं? आम्ही नक्की काय केलं ते आठवत नाही पण आता विचार करताना वाटतं की किती
लाडावलेली मुलं होतो आम्ही! असो. पण त्यानंतर आठवी ते दहावी आमचे इंग्रजीचे ग्रह
अत्यंत उच्चीचे राहिले! We had the best possible English teachers in the
world!
आम्ही एकीकडे संस्कृत आणि हिंदीच्या टीमविच्या परीक्षा
देत होतो. शिवाय आद्य शंकराचार्य प्रतिष्ठानतर्फे एक पाठांतर स्पर्धा होत असे.
त्यात शंकराचार्यांची तीन स्त्रोत्रे दिली जात आणि मग स्पर्धेच्या वेळी चिठ्ठी
उचलून त्यातलं येईल ते स्तोत्र म्हणायचं. आमच्या वर्गाने बरीच वर्षं त्यात भाग
घेतला होता. ज्या शाळेतली सगळ्यात जास्ती मुलं जिंकायची त्या शाळेला करंडक होता.
तो आम्ही एकाहून अधिक वेळा पटकावला होता. ह्या स्पर्धा सारसबागेसमोरच्या
शंकराचार्य मठात होत असत. ह्या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला खूप छान स्तोत्र
शिकायला मिळाली. त्यातली काही लक्षात राहिली आहेत थोडीफार. माझं आत्मषटकम् आवडतं
स्तोत्र आहे. त्याशिवाय एकदा आम्ही शाळेच्या वेळात भरत नाट्य मंदिरात एक विनोदी
संस्कृत नाटक देखील पाहायला गेलो होतो. सातवीत आमची वर्गखोली दोनदा बदलली होती.
मला प्रबोधिनीतले मुलींचे वर्ग फार आवडतात. मोठ्या मोठ्या भिंतभर खिडक्या, भरपूर
प्रकाश आणि एकदम हवेशीर! तर त्या भिंतभर खिडक्यांना ऊन येऊ नये म्हणून पडदे
लावायची सोय होती. आम्ही वर्ग बदलून ज्या दुसऱ्या वर्गात गेलो त्या पडद्यांचा
दांडा जरा नाजूक झाला होता. जरा जोर लावून ओढलं की सगळे पडदे खाली पडत! एकदा
आमच्या हे लक्षात आल्यापासून आम्ही हे अस्त्र वापरायला सुरुवात केली! कोणत्याही तासाला
जरा बोअर व्हायला लागलं की खिडकी शेजारी बसणाऱ्या मुली पडदा ओढायच्या की धडाम! मग
वर चढून तो दांडा बसवा वगैरे मध्ये १० मिनिटं जायची! अर्थात ही ट्रिक आम्ही सर्वात
जास्ती इंग्रजीच्या तासांना वापरली!
सर्कसला दिलेली भेट – पुण्यात तेव्हा सर्कस आली
होती आणि आम्ही काही जणींनी जाऊन तिथल्या कलाकारांच्या भेटी घेतल्या होत्या. असे
सकाळी साडे आठ नऊ वाजता गेलो होतो. काहीही दिवे झगमगाट नसताना सर्कशीचा तंबू आणि
तिथल्या बाकी तंबूत जाऊन गप्पा मारताना एका वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटले
होते. मग त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही त्या सर्कसचा शो पहायला गेलो. मजा आली पण सकाळची
चित्र पण मनात राहिली होती. आम्ही ही सर्कस भेट/मुलाखत छात्र प्रबोधनच्या अंकासाठी
घेतली होती. ती छापून आली की नाही ते आठवत नाही. पण सातवीत मी अनुराधा ताईंनी
सुचवलं म्हणून राज्य स्तरीय बालकुमार साहित्य स्पर्धेत एक कथा लिहून पाठवली होती
जिला दुसरा क्रमांक मिळाला होता. पहिला क्रमांक देखील प्रबोधिनीच्याच सहावीतल्या एकीला
मिळाला होता. ह्या दोन्ही कथा छात्र प्रबोधन मध्ये छापून आल्या होत्या. त्याचा बक्षीस
समारंभ शाळेतच झाला होता. त्याची इतकी आठवण राहण्याचे कारण म्हणजे त्या
समारंभासाठी भा.रा. भागवत आणि त्यांच्या पत्नी लीलावती भागवत प्रमुख पाहुणे होते
आणि त्यांच्याच हातून आम्हाला बक्षीस मिळाले होते. भा.रां.ची पुस्तके अत्यंत
आवडत्या कॅटेगरीत असल्याने त्यांच्या हस्ते बक्षीस मिळणार ह्याचा भयंकर आनंद झाला होता!
छाप्रची अजून एक आठवण म्हणजे छाप्रची एक स्वतःची
अत्यंत सुरेख लायब्ररी होती. त्यात मराठी साहित्यातली उत्तमोत्तम सर्व पुस्तके
होती. आमच्या वर्गातल्या काही वाचनवेड्या मुलींनी तीही लायब्ररी लावली होती. मी
जवळपास रोज नवीन पुस्तक घेऊन यायचे. रोज शाळेत आल्यावर पहिल्यांदा दुसऱ्या
मजल्यावरच्या छाप्रच्या कार्यालयात जायचं, तिथे पुस्तक बदलायचं, सायकलची किल्ली
तिथेच विसरायची आणि मग तंद्रीत वर चौथ्या मजल्यावर आपल्या वर्गात यायचं. मग शाळा
सुटल्यावर किंवा आता आपल्याला घरी गेलं पाहिजे अशी जाणीव झाल्यावर किल्ली शोधायची
आणि मग पुन्हा छाप्रच्या कार्यालयात जाऊन सायकलची किल्ली घ्यायची हा माझा ठरलेला
दिनक्रम होता. अधाश्यासारखी पुस्तकं वाचायचो आम्ही!
सातवी ते दहावी आम्हाला आठवड्यातून दोन तास अभिव्यक्तीचे
तास असायचे. अभिव्यक्तीचे विविध विषय होते – बांधणी, रांगोळी, चित्रकला, भौमितिक प्रतिकृती,
नाट्य, शिल्पकला आणि प्रतिभाशाली लेखन. हे विषय बदलत राहायचे. आधी ह्यात स्वयंपाककला,
शिवण असेही विषय होते. मी दोन वर्ष प्र.ले., एक वर्ष बांधणी आणि एक वर्ष भौमितीक
प्रतिकृती अशा अभिव्यक्तीत होते. ह्या अभिव्यक्तीच्या तासाला सातवी ते दहावीच्या
सगळ्या मुली एकत्र असायचो. मजा यायची! प्र.ले. च्या तासांना पहिल्यांदा जी.ए.
कुलकर्णी यांची एक कथा वाचली होती आणि भारावून गेलो होतो. इतके की काही काळ कोणीच
बोललो नाही!
अशा किती छोट्या छोट्या आठवणी आहेत! शाळेत रोजचा
दिवस मज्जा असायची आणि आज हा काल आणि उद्यापेक्षा वेगळा असायचा. त्यामुळे शाळा
बुडवणे वगैरे तर शक्यच नव्हते पण रविवारसुद्धा कसाबसा संपवून कधी शाळेत जातोय असं
पण व्हायचं कधीकधी! किंवा रविवारी प्रकल्पाच्या कामासाठी शाळेत किंवा कोणाच्या तरी
घरी जमायचं आणि मजा करायची! We were very busy and very constructively
busy! प्रबोधिनीपण
अंगी मुरत जात होतं. मला वाटतं प्रबोधिनीतल्या सहा वर्षांचे दोन भाग करता येतील.
पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी. आम्ही पाचवी ते सातवी जे जे काही केलं त्याच्या
दसपट गोष्टी पुढच्या तीन वर्षांत केल्या, नवीन अनुभव घेतले, त्यातून मोठे झालो,
शहाणे झालो.
No comments:
Post a Comment