पाचवीत असताना इंग्रजी माध्यमाच्या मुलामुलींचे
इंग्रजीचे आणि मराठीचे तास वेगवेगळे व्हायचे. पण सहावीपासून आम्ही सगळ्या सगळे
विषय एका वर्गात शिकू लागलो. सहावीत आम्हाला विशाखा ताई वर्गशिक्षिका म्हणून लाभल्या
होत्या. त्या गणित शिकवायच्या. अतिशय शांत, मृदू स्वभाव! आमची आणि त्यांची जाम
म्हणजे जाम गट्टी जुळली! सहावीमधली सगळ्यात ठळक आठवण म्हणजे गणिताचा महायज्ञ! त्या
दिवशी काय झालं होतं कोण जाणे आमचे बरेचसे तास होऊ शकणार नव्हते. विशाखा ताई
वर्गात आल्या आणि त्यांनी ही बातमी दिली! काही काळ आनंद प्रदर्शनासाठी जोरदार गोंधळ
घालू दिल्यानंतर त्यांनी विचारलं मग काय करणार दिवसभर? बरेच पर्याय पुढे आले पण शेवटी
गणिताचा महायज्ञ करण्याची कल्पना मान्य झाली. मग ग्रंथालयात जाऊन जितकी मिळतील
तितकी सहावीच्या गणिताची पुस्तकं आणण्यात आली. CBSE board ह्या बाबतीत खूप छान आहे. अनेक प्रकाशन
संस्था अभ्यासक्रमानुसार पुस्तके बाजारात आणत असतात. विशाखा ताई काही पूर्ण वेळ
थांबू शकणार नव्हत्या. त्यांनी साधारण एक शिस्त लावून दिली आणि मग आमचा वर्ग पुढचे
४-५ तास गणिते सोडवीत होता. मज्जा आली! सहा हजाराच्या वर गणिते सोडवली आम्ही त्या
दिवशी! मग दुसऱ्या दिवशी प्रार्थनेच्या वेळी सगळ्या शाळेला आमच्या वर्गाचा पराक्रम
सांगण्यात आला! आमची कॉलर ताठ! सहावीचा आमचा सहाध्याय दिन थेऊरला झाला. नुकतीच
स्वामी कादंबरी वाचल्याने माधवरावांची समाधी, गणपतीचे देऊळ ह्या साऱ्या गोष्टी अत्यंत
भारावलेल्या मनाने पाहिल्या! बस स्टँडवर उभं असताना पेरू घेऊन खाल्ले होते हे
लक्षात आहे. नंतर पुढे आम्ही सगळ्याजणी पुन्हा थेऊरला एका वेगळ्याच कारणासाठी
राहायला आलो. पण त्या आठवणी आठवीत J
सहावीसाठी आमचं वर्गोदिष्ट होतं पाठांतर! आमच्या
वर्गाची गाणी आणि कवितांची आवड लक्षात घेऊन हे मिळालं असावं! कविता ताईने आम्हाला
भरपूर गाणी आणि कविता शिकवल्या! आम्ही वेगवेगळ्या भारतीय भाषांमधली गाणी सुद्धा
शिकलो होतो. आम्हाला physics शिकवायला मंजुषा ताई मुंगी होत्या. त्यांच्या
तासाला शेवटची १५ मिनिटं त्या त्यांचे अनुभव सांगायच्या. त्यांनी पूर्वी युवती
विभागात काम केलं होतं. त्यांच्या तोंडून आम्ही गाजलेले रूपकंवर सती प्रकरण ऐकले.
त्यावेळी प्रबोधिनीतर्फे काही युवती प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करण्यासाठी
राजस्थान दौऱ्यावर गेल्या होत्या त्यात मंजुषा ताई पण होत्या! त्यामुळे त्यांचे
प्रत्यक्षदर्शी अनुभव ऐकणे हा देखील एक थ्रिलिंग अनुभव होता. ‘स्वतः पाण्यात उतरा,
अनुभव घ्या. काठावर राहून परिस्थिती कशी समजणार?’ अशी प्रबोधिनीची धारणा ह्या
अनुभव कथनातून आमच्यापर्यंत पोहोचत होती.
आम्हाला पाचवी आणि सहावीमध्ये चित्रकला आणि
सातवीपर्यंत संगीत असे विषय म्हणून होते. अर्थात सातवीनंतर ज्यांना आवड असेल
त्यांच्यासाठी ह्या विषयांची सोय होतीच. हिंदी शिकवणाऱ्या चारुता ताई आम्हाला चित्रकला
शिकवायच्या. चारुता ताई हिंदी शिकवताना खूप कडक असायच्या पण त्यादेखील तासातला काही
वेळ गप्पांना द्यायच्या. चारुता ताईंशी गप्पा म्हणजे हास्याचा पूर! एखादी गंमत/प्रसंग
रंगवून सांगण्यात त्यांचा हातखंडा! त्यामुळे माझी चित्रकला म्हणजे एक मोठे अंडाकृती
वर्तुळ असले तरी चारुता ताईंच्या तासाला मज्जाच यायची! नंतर आठवीत त्या आमच्या
वर्ग शिक्षिका असताना आम्ही त्यांच्याबरोबर खूप धमाल केली.
मंजुषा ताई (ही वेगळी) संगीत शिकवायला होती.
आमच्यापैकी बहुतेक सगळ्या जणींनी गांधर्व महाविद्यालयाच्या ३/४ गाण्यांच्या परीक्षा
दिल्या आहेत ह्याचं श्रेय मंजुषा ताईचं. आम्ही शाळेत असताना आणि त्यानंतर शाळेचा
संगीत कक्ष अद्ययावत आणि विविध वाद्यांनी सुसज्ज करण्याचं मोठं काम मंजुषा ताईने
केलं. ह्या प्रकारात गाण्याच्या मुली असा एक गट वर्गात तयार झाला होता. विविध आंतरशालेय
गाण्याच्या स्पर्धांमध्ये सहभागी होणे वगैरे गोष्टीत ह्या गटाचा सहभाग असायचा.
मंजुषा ताईने गाण्याच्या मुलींना बोलावलं आहे असा निरोप आला की ह्या सगळ्या
सटकायच्या!
पाचवीत की सहावीत आमची न्यू इंग्लिश स्कूल च्या
मैदानावर क्रीडा प्रात्याक्षिके झाली होती. त्यासाठी जोरदार सराव केल्याचं आठवतंय!
रोप मल्लखांब, सायकल कसरती, जिम्नॅस्टिक्स, आगीतून उड्या वगैरे साहसी प्रकार त्यात
आम्ही केले होते. एरवी शाळा सुटल्यावर एक दिवसाआड दल असायचं. त्यात वेगवेगळे खेळ,
व्यायाम, गणपतीच्या दिवसांत बरच्यांची practice असा कार्यक्रम असायचा. हे दल युवती
विभागातल्या ताया घ्यायच्या (मुलांचे युवक विभागातले दादा). मजा असायची. ह्यातल्या
बऱ्याच जणी प्रबोधिनीच्याच माजी विद्यार्थिनी. त्या त्यांचं कॉलेज सांभाळून आमचं
दल घ्यायला यायच्या. एकूण मजा असायची. ह्याच तायांबरोबर मग आम्ही पावसाळी सहलीला किल्ले
सर करायला जायचो, तंबूतलं शिबीर नावाचा एक अद्भूत प्रकार होता. त्याच्या आठवणी
नंतर सविस्तर लिहीनच! ह्या ताया फार लाडक्या! आमच्या friend, philosopher
and guide. त्यांच्याबरोबर
शाळेतल्या ताईंच्या तक्रारी, चेष्टा, वाद, अभ्यास ते आयुष्य सगळ्यावर गहन चर्चा
असं सगळं चालायचं! मग दल ६:३० ला सुटलं तरी टीपी करत ७:३० वाजायचे. मग अत्यंत
नाईलाजाने गप्पा आवरून घराच्या दिशेने कूच करायची. सहावीपासून माझ्यासाठी घडलेला
मोठा बदल म्हणजे मी शाळेत रिक्षाऐवजी सायकलने जाऊ लागले होते. त्यामुळे अचानक वेळेचं
खूप स्वातंत्र्य मिळालं! माझ्या आत्याची दोन्ही मुलं प्रबोधिनीची असल्याने तिला
आमच्या ह्या बेभरवशी कारभाराची कल्पना होती म्हणून बरं! नाहीतर प्रबोधिनीतल्या
मुलांचे पालक होणे सोपे काम नव्हे!
क्रीडा प्रकाराविषयी लिहिताना एक खंत व्यक्त
केल्यावाचून राहवत नाही. गावाच्या अगदी मध्यवर्ती भागात असल्याने शाळेला स्वतःचे
मैदान नाही. ही एक उणीव तेव्हाही त्रास देत असे. पण मग त्या निमित्ताने
आजूबाजूच्या सर्व मैदानांची ओळख झाली. तिथल्या व्यवस्थापकांशी बोलून आवश्यक त्या परवानग्या
मिळवणे, मैदानाची आपल्यापुरती निगा राखणे, तिथल्या वेळा पाळणे अशा असंख्य अडचणींना
तोंड देत आमचे ताई, दादा (आणि अर्थात त्यांच्यापाठी शाळा) आमच्यासाठी दल घेत असत.
महाराष्ट्र मंडळचे मैदान, न्यू इंग्लिश स्कूल, भावे स्कूल, १७ नंबरचे मैदान, नवी
पेठ, सुभाषनगर अशा अनेक ठिकाणी असलेल्या मैदानावर आमचे दल भरत असे. तुळशीबागेच्या
समोरच्या भाऊ महाराज बोळात पण एक मैदान होते. तिथले दल अगदी वेळेत
संपवावे लागे कारण तिथे नंतर संघाची शाखा भरत असे. हे सोडून उपासना मंदिर आणि
शाळेची गच्ची ह्या नेहमीच्या यशस्वी जागा होत्याच! इतक्या अडचणी असल्या तरी उत्साह
भरपूर! पण तरीही शाळेतली एखादी गोष्ट बदलायची असेल तर मी ही गोष्ट बदलेन! शाळेला
एक मोठं, विस्तीर्ण मैदान मिळवून देईन.
सहावीत केलेल्या इतर उद्योगांमध्ये विविध
देशांच्या दुतावासांना पत्र लिहून त्या देशांबद्दल माहिती मिळवणे असा एक प्रकल्प
केला होता, ह्या शिवाय पुर्वांचलामधल्या काही विद्यार्थ्यांशी पत्रमैत्री देखील
केली होती. एकुणात नवनवीन कल्पनांचा विचार करणे आणि त्याची भान विसरून अंमलबजावणी
करणे हा गुण अंगी लागायला सुरुवात झाली होती. काहीतरी कामासाठी रविवारी शाळेत
चक्कर मारणे देखील सुरु झाले होते. कोणत्याशा बाल चित्रपट चळवळीमार्फत विजय
टॉकीजला काही रविवार चार्ली चॅप्लिनचे सिनेमे बघितल्याचं पण आठवतंय.
सध्या शाळेच्या दोन इमारती आहेत एक नवीन आणि एक
जुनी. पण मी शाळेत असताना नवीन इमारतीच्या जागी एक बैठी, दुमजली दगडी वास्तू होती
ज्यात युवती विभाग आणि सहनिवास (मुलांचं हॉस्टेल) होतं. यु.वि. ही
टीपी करण्याची नेहमीची जागा. त्या दोन खोल्यात आम्ही प्रचंड दंगा घालायचो. जसजशी
वर्ष गेली तशा आमच्या खास जागा शोधून काढल्या होत्या. डोक्यात सतत चक्र फिरत
असायची. त्या गोष्टी discuss करायला ह्या जागा होत्या किंवा मग एकटीने जाऊन
निवांत पुस्तक वाचणे/अभ्यास करणे ह्यासाठी. कोणत्याही जागेची एक short
forms ची
संकेतभाषा असते. तशी प्रबोधिनीची पण आहेच. प्र.मा.सं, संत्रिका, छाप्र, यु.वि. असे
जागांचे short forms तोंडी
बसले. शाळा ही हळूहळू दुसरं घर होत गेली.
मला वाटतं सहावीतच आम्ही नागपंचमीला रात्री शाळेत
राहायला आलो होतो. हे पहिल्यांदा, नंतर मग अनेकदा शाळेत राहायला गेलो. घरून जेवून आलो
आणि मग रात्री उपासना मंदिरात बसून मेंदी काढली. गच्चीवर जाऊन तारे मोजले आणि मग बाराच्या
पुढे तायांचा ओरडा ऐकून झोपलो. त्याचवेळी नुकत्याच वाचलेल्या तोत्तोचानच्या
शाळेसारखी आपली शाळा आहे असा विचार करून मज्जा वाटली होती. रच्च्याकाने
तोत्तोचानचा मराठी अनुवाद एका माजी प्रबोधिकेने (चेतना सरदेशमुख गोसावी) केला आहे J
मला आठवतंय त्याप्रमाणे आम्ही सहावीत एकदा
पोंक्षे सरांशी कशावरून तरी तासभर वाद घातला होता. आमची काहीतरी तक्रार होती आणि
सर आमचं म्हणणं ऐकून त्यावर त्यांची बाजू मांडत होते. एका वर्षात आपण
आपल्या शाळेच्या प्राचार्यांना “मला/आम्हाला हे पटत नाही/मान्य नाही” असं सांगू
शकतो आणि आपलं म्हणणं ऐकून घेतलं जाईल एवढा आत्मविश्वास आणि (शाळेविषयी) विश्वास सहावीत
निर्माण झाला होता एवढं मात्र नक्की!
सहावी संपताना विशाखा ताईंचं आणि आमचं इतकं
गुळपीठ जमलं होतं की आम्ही सगळ्यांनी ठरवून आपल्या मनोगतामध्ये आम्हाला सातवीत
विशाखा ताईच वर्ग शिक्षिका म्हणून हव्या अशी मागणी नोंदवली होती! पण त्याचं पुढे
काय झालं ते सातवीच्या पोस्टमध्ये!
No comments:
Post a Comment